भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधातील लैंगिक छळांच्या आरोपावरून त्यांना अटक करावी या मागणीसाठी आंदोलनकर्त्या तिन्ही प्रमुख कुस्तीगीरांनी आंदोलन मागे घेतले, अशा बातम्या सोमवारी दुपारी अचानक सुरू झाल्या. त्यानंतर तिन्ही कुस्तीगीरांनी त्वरित खुलासा करून आंदोलन मागे घेण्याबाबतच्या बातम्यांचे खंडन केले. आंदोलक कुस्तीगीरांनी रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन सुमारे दोन तास त्यांच्याशी चर्चा केली. त्याच्या दुसऱ्या दिवशीच तीनही प्रमुख कुस्तीपटूंनी आंदोलन माघारीचे पाऊल उचलल्याच्या बातम्या सुरू झाल्यावर मलिक व पुनिया यांनी तातडीने खुलासा केला.
संसद भवनाच्या उद्घाटनाच्या दिवशीच दिल्ली पोलिसांनी जंतरमंतरवर कुस्तीगीरांचे आंदोलन चिरडले व तीनही कुस्तीगीरांना काही काळ ताब्यात घेतले. कुस्तीगीरांच्या समर्थनार्थ हरयाणा व उत्तर प्रदेशातील खाप पंचायतीही उतरल्यावर या धोक्याची जाणीव सरकारच्या वरिष्ठ पातळीवर झाली. त्यानंतर कुस्तीगीरांना शहा यांच्या भेटीची वेळ मिळाली. शहा यांनी कुस्तीगीरांना, कायद्याला आपले काम करू द्या, असे सांगितले.
आम्हाला नोकरी जाण्याची भीती दाखवली जात आहे. आम्हाला घाबरवू नका. गरज पडली तर १० सेकंदांत नोकरी सोडू.
– बजरंग पुनिया, विनेश फोगट
दरम्यान, आंदोलन मागे घेण्याच्या वृत्ताबाबत साक्षीने ट्वीट केले की, ही बातमी पूर्णपणे चुकीची आहे. ‘न्यायाच्या लढ्यात आमच्यापैकी कोणीही मागे हटले नाही आणि हटणारही नाही. सत्याग्रहासोबत मी रेल्वेतील माझे कर्तव्यही बजावत आहे. आम्हाला न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरू आहे. कृपया कोणीतरी मदत करा. चुकीच्या बातम्या पसरवू नका’, असे साक्षीने म्हटले आहे.
‘होय, आम्ही अमित शहा यांना भेटलो. मात्र ती सामान्य भेट होती. आमची एकच मागणी आहे आणि ती म्हणजे त्यांना (बृजभूषण सिंह) अटक करा. आम्ही कोणीही आंदोलनातून मागे हटलो नाही. मी रेल्वेत ओएसडी म्हणून पुन्हा कामाला सुरुवात केली आहे. आम्ही मागे हटणार नाही. तिने (अल्पवयीन कुस्तीगीर) एकही गुन्हा मागे घेतलेला नाही. हे सर्व खोटे आहे’, असेही साक्षीने म्हटले आहे.