बेळगावजवळच्या संकेश्वर येथील ओंकार दीपक भिसे (१९) याचा २ जून रोजी तर, पुणे येथील प्रशांत गुंड (२८) याचा ४ जून रोजी रायगडावर मृत्यू झाला. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष म्हणून आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली या घटनांची चौकशी करण्याचे आदेश दिले. महाड उपविभागीय दंडाधिकारी प्रतिमा पुदलवाड यांच्यामार्फत ही चौकशी होणार आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने महाड येथे घेतलेल्या बैठकांमध्ये दिलेल्या सूचनांची संबंधित विभागांनी अंमलबजावणी केली होती का, याबाबत त्या चौकशी करणार आहेत. याशिवाय, संबंधितांचे म्हणणे दाखल करून घेणे, या घटना कोणत्याही व्यक्ती अथवा यंत्रणांची चूक अथवा हलगर्जीमुळे घडल्या की हा अपघात होता याबाबत निरीक्षण नोंदविणे व या घटनेचा चौकशी अहवाल स्पष्ट अभिप्रायासह सादर करणे या जबाबदाऱ्या त्यांच्यावर आहेत.
पिण्याच्या पाण्याची सोय, अन्नछत्र
गेल्या दोन महिन्यांपासून शिवराज्याभिषेक सोहळ्याचे नियोजन सुरु आहे. राज्यभरातून येणाऱ्या पर्यटक आणि शिवभक्तांसाठी गडाच्या पायथ्याशी कोंझर, वालुसरे, पाचाड येथे वाहन पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. एकाच वेळी साडेतीन हजार वाहने या ठिकाणी पार्किंग करता येणार आहेत. उन्हाळ्याचे दिवस असल्याने गडावर काळा हौद येथे दीड लाख लिटर, कोहीम तलाव येथे दीड लाख लिटर, हनुमान टाकी येथे एक लाख लिटर, गंगासागर येथे दीड लाख लिटर, श्रीगोंडा येथे एक लाख लिटर पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
पायरी मार्गाने जाणाऱ्या प्रत्येक शिवभक्तासाठी अन्नछत्र, पिण्याच्या पाण्याची बाटली तसेच वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. गडावर येणाऱ्या शिवभक्तांसाठी मर्दानी खेळ, शाहिरी अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. गडावर जाण्यासाठी सरसकट रोप-वे तिकीट विक्री बंद ठेवण्यात आली आहे. गडावर असलेल्या पाणीटंचाईमुळे रोप-वेचा वापर फक्त पाणी वाहतुकीसाठी व शासकीय वापरासाठी करण्यात येत आहे.