रायगड : रायगडावर आज होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सांगता समारंभासाठी शिवभक्तांची अलोट गर्दी झाली आहे. शिवप्रेमींच्या उपस्थितीने रायगड ओसंडून वाहत असून यामुळे प्रशासनापुढे नवा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी रायगडावर येण्यासाठी इच्छुक असणाऱ्या शिवप्रेमींना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. ‘दुर्गराज रायगडवर सध्या जवळपास अडीच लाख लोक उपस्थित असून गडाच्या खाली साधारण ५० ते ७५ हजार लोक आलेले आहेत. इतके लोक गडावर सामावणे शक्य नसल्याने कृपया गडाखाली असलेल्या लोकांनी गड चढण्याची घाई करू नये,’ असं आवाहन संभाजीराजे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केलं आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवप्रेमी मोठ्या संख्येने रायगडावर दाखल झाले आहेत. या गर्दीमुळे गडावरील व्यवस्थेवर ताण आला असून त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रशासनाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर संभाजीराजे छत्रपती यांनी माहिती देताना सांगितले की, ‘जिल्हा व पोलीस प्रशासनासोबत बैठक झालेली आहे. सध्या गडावर असलेले लोक ९ ते १० वाजताच्या दरम्यान गड उतरतील. तेव्हा शिस्तबद्ध रीतीने खाली असलेल्या लोकांना वर सोडले जाईल. सर्व शिवभक्तांना महाराजांना अभिवादन करता येईल, तोपर्यंत मी गडउतार होणार नाही, याची शाश्वती मी देतो. कृपया सर्वांनी सहकार्य करावे,’ असं संभाजीराजे म्हणाले.

अमित शहांसोबतच्या बैठकीत मंत्रीमंडळ विस्तारावर खल, मनसेला युतीत सहभागी करणार?

दरम्यान, हृदयविकार, मधुमेह आणि श्वसनविकार असलेल्या व्यक्तींनी गडावर येणे टाळावे, असं आवाहन यापूर्वीच जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं होतं. तसेच गडावर १०९ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून जवळपास दोन हजार पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गडावर वैशिष्ट्यपूर्ण आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी स्वराज्याची राजधानी उजळून निघाली होती.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री उदय सामंत, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक मंत्री, खासदार, आमदारांच्या उपस्थितीत दोन जून रोजी तिथीप्रमाणे ३५०वा शिवराज्याभिषेक सोहळा झाला होता. यानिमित्त १ ते ६ जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या विविध समारंभाची आज, मंगळवारी सांगता होत आहे. आज, तारखेनुसार शिवराज्याभिषेक दिन असल्याने राज्यभरातून शिवभक्तांची गर्दी होणे अपेक्षित होते. यानिमित्त गडावर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे व प्रशासनातील त्यांचे सर्व सहकारी, विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी हा सोहळा यशस्वी होण्यासाठी अहोरात्र अथक परिश्रम घेत आहेत.

पिण्याच्या पाण्याची सोय, अन्नछत्र

पायरी मार्गाने जाणाऱ्या सर्व शिवभक्तांसाठी अन्नछत्र, पिण्याच्या पाण्याची बाटली तसेच वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. गडावर येणाऱ्या शिवभक्तांसाठी मर्दानी खेळ, शाहिरी अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं आहे. गडावर जाण्यासाठी सरसकट रोप-वे तिकीट विक्री बंद ठेवण्यात आली आहे. गडावर असलेल्या पाणीटंचाईमुळे रोप-वेचा वापर फक्त पाणी वाहतुकीसाठी व शासकीय वापरासाठी करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here