म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबई : उन्हाच्या तडाख्याने मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव तळ गाठत असून येत्या काही दिवसांत मान्सूनचे आगमन न झाल्यास पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने धरणांमधील राखीव साठ्यातील १५० दशलक्ष लीटर पाणी मुंबईला देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. राखीव साठ्यामुळे मुंबईत आणखी एक ते दीड महिना म्हणजे जुलै अखेरपर्यंत पाणी पुरवठा करणे शक्य होणार आहे.

तानसा, मोडकसागर, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, भातसा, विहार व तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणांत १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. ५ जून रोजी सातही धरणांत ११.५८ टक्के म्हणजे १ लाख ६७ हजार ५४९ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे.

पावसाचे आगमन लांबणीवर पडल्यास मुंबईला अतिरिक्त पाण्याची गरज भासू शकते. यासाठी राज्य सरकारच्या अप्पर वैतरणा व भातसा धरणातून प्रत्येकी ७५ हजार दशलक्ष लिटर अतिरिक्त राखीव पाणीसाठा मिळावा, अशी मागणी पालिकेने सरकारकडे केली होती. याबाबत मुंबई भाजपचे अध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांनी सोमवारी पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी आयुक्तांनी राज्य शासनाने आपला अतिरिक्त पाणी साठा पालिकेला देण्याचे मान्य केले आहे, अशी माहिती दिल्याचे ॲड. शेलार यांनी सांगितले. शेलार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे याबाबत आभार मानले आहेत.

कपात टळणार?

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीसाठा कमी होत असल्याने १० ते १५ टक्के पाणी कपातीचे संकट असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र राज्य सरकारने पालिकेला राखीव कोट्यातील पाणी देण्याचे मान्य केल्याने पाणीकपात टळणार की पुढील काही दिवसांची तरतूद म्हणून प्रशासन पाणीकपात करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जल विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तूर्तास कपात केली जाणार नाही. याबाबत जून अखेरीस निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

अप्पर वैतरणा व भातसा धरणांतून प्रत्येकी ७५ हजार दशलक्ष लिटर पाणी राखीव साठ्यातून मिळणार आहे. पाणीकपातीचा सध्या कोणताही विचार नाही.

-पुरूषोत्तम माळवदे , मुख्य अभियंता (जल विभाग), मुंबई महापालिका

दरवाढीला भाजप, काँग्रेसचा विरोध

महापालिकेच्या प्रस्तावित पाणीपट्टी दरवाढीला भाजप आणि काँग्रेसने विरोध केला आहे. १६ जूनपासून पाणीपट्टी दरामध्ये वाढ करण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे. लिटरमागे २५ पैसे ते चार रुपयांपर्यंत ही वाढ प्रस्तावित आहे. या दरवाढीला आमचा तीव्र विरोध असल्याचे शेलार यांनी स्पष्ट केले. एकाबाजूला मुंबईकरांना मालमत्ता करात सूट देऊन एका हाताने द्यायचे आणि दुसऱ्या बाजूला पाणीपट्टी वाढवून दुसऱ्या हाताने काढून घ्यायचे हे चालणार नाही. आयुक्तांनी पाणीपट्टी वाढ रोखावी, असेही ते म्हणाले. पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी जलबोगदा फुटीमुळे महिनाभर मुंबईत मोठी पाणीकपात करण्यात आली होती. त्यामुळे मुंबईकरांना खूप त्रास सहन करावा लागला होता. आधीच मुंबईकरांना पुरेसे पाणी मिळत नाही. त्यात दरवाढ करून त्रासात आणखी भर टाकू नये, असे राजा यांनी सांगितले.
अपघात रोखण्यासाठी लाँच केलेले ‘रेल्वे कवच’ आहे तरी काय?, जाणून घ्या खास टेक्नोलॉजी

तलावांतील पाणीसाठा

तलाव – पाणीसाठा (दशलक्ष लिटरमध्ये)- टक्के

अप्पर वैतरणा ०

मोडक सागर ३४,०२८- २६.३९

तानसा ३३,५६८ -२३.१४

मध्य वैतरणा २३,२३०- १२.००

भातसा ६७,०४६- ९.३५

विहार ७,२०२- २६.४५

तुलसी २,४७६- ३०.७८

Raigad: शिवराज्याभिषेक सोहळ्यादरम्यान किल्ले रायगडावर दोन तरुणांचा मृत्यू, जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश

तीन वर्षांतील ५ जूनचा साठा

(दशलक्ष लिटर) ( टक्के)

२०२३ – १,६७, ५४९ (११.५८)

२०२२ – २,२९, ०८० (१५.८३)

२०२१ – १,९४,३३१ (१३.४३ )

shivrajyabhishek sohala 2023 : रायगडावर अडीच लाख शिवभक्त; संभाजीराजेंकडून महत्त्वाच्या सूचना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here