छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५०व्या राज्याभिषेक दिनानिमित्त गेल्या आठवडाभरापासून राज्य सरकारने विविध कार्यक्रमांना सुरुवात केली आहे. सांस्कृतिक विभागाने विशेष टपाल तिकिटाचे अनावरण करण्याचे निश्चित केल्यानंतर सोमवारी पर्यटन विभागाने नव्या निर्णयाची घोषणा केली आहे. यासाठी लोढा यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक सोमवारी मंत्रालयात पार पडली. या बैठकीत संग्रहालयाच्या उभारणीचा निर्णय घेण्यात आला. त्याचे काम लवकरच सुरू करण्याचा पर्यटन विभागाचा मानस असून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अखत्यारित ही उभारणी होणार आहे.
‘गोराई येथील एमटीडीसीच्या जागेवर हे संग्रहालय उभारण्यात येणार आहे. जवळपास १३६ एकर जागा यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या संग्रहालयात शिवाजी महाराजांच्या विविध किल्ल्यांची, प्रामुख्याने सागरी किल्ल्यांची प्रतिकृती आणि इतर माहिती पाहता येईल. त्याशिवाय गनिमी कावा असो किंवा इतर युद्धनीती या सर्वांची माहिती याठिकाणी उपलब्ध होऊ शकेल. याबरोबरच शिवाजी महाराजांच्या विविध लढायांची माहितीही संग्रहालयाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. या संग्रहालयाची अंतिम रूपरेषा निश्चित झाली असून लवकरच काम सुरू करण्यात येईल’, असे त्यांनी ‘मटा’शी बोलताना जाहीर केले.
शिवकाळातील ‘होन’चे टपाल तिकीट
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५०व्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत नवे टपाल तिकीट काढण्याचा निर्णय राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केला. त्यानुसार शिवकाळातील ‘सुवर्ण होन’ नाण्यावर टपाल तिकीट काढण्यात येणार असून या तिकिटाचे अनावरण आज, मंगळवारी राज्यपाल रमेश बैस यांच्याहस्ते होणार असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी यावेळी दिली. महाराजांचा ३५० वर्षांपूर्वी राज्याभिषेक सोहळा झाला, त्यादिवशी ‘शिवराई होन’ नावाचे सोन्याचे नाणे चलनात आणले होते. त्यावर हे टपाल तिकीट काढण्यात येणार आहे.