डोंबिवली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप या राज्यातील सत्तेत सहभागी असलेल्या मित्र पक्षात ठाणे जिल्ह्यात सुरु असलेली धुसफूस थांबता थांबत नसल्याचे सध्या चित्र आहे. तर दुसरीकडे आगरी कोळी वारकरी भवनावरून शिवसेना आणि मनसे मध्ये जुंपल्याचे दिसून येत आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय असलेले डोंबिवली भाजपचे पदाधिकारी नंदू जोशी यांच्यावर विनयभंग प्रकरणी दाखल झालेला गुन्हा हे या दोन पक्षातील वितुष्टाचे ताजे कारण ठरले आहे. जोशी यांच्यावर गुन्हा दाखल होताच भाजपने मानपाडा पोलिस ठाण्यात मोर्चा काढला, याला मनसे सुद्धा पाठींबा दिला आणि अवघ्या २४ तासातच मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. खरे तर भाजपच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करणाऱ्या शेखर बागडे यांची बदलीच होईल अशी चर्चा डोंबिवलीत होती. मात्र, बागडे यांना थेट ठाण्याहून ‘पाठबळ’ मिळाल्याने बदलीऐवजी त्यांची सक्तीच्या रजेवर सुटका करण्यात आल्याचे बोलले जाते. यानिमित्ताने डोंबिवलीकर चव्हाण आणि ठाणेकरांचे सूत काही केल्या जमत नसल्याच्या चर्चेने मात्र जोर धरला आहे. तर स्थानिक पातळीवर भाजप आणि मनसेची जवळीक वाढली आहे. त्यामुळे येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप-मनसे युती होऊ शकते.

Dombivli News: डोंबिवलीत भाजपच्या बड्या नेत्याची महिलेकडे शारीरिक सुखाची मागणी, विनयभंगाचा गुन्हा दाखल

गेल्या नऊ- दहा महिन्यात तर शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांच्यात स्थानिक पातळीवर सातत्याने खटके उडत असून राज्यातील मंत्री मंडळात सहभागी असलेले रविंद्र चव्हाण यांनाही याची झळ पोहचू लागल्याने आता आम्हाला वाली कोण असा सवाल जिल्ह्यातील भाजप नेते, पदाधिकारी दबक्या सुरात करु लागले आहेत. नंदू जोशी यांच्याविरोधात एका महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी अधिक तपास करुन पुढील कार्यवाही करायला हवी होती असे स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांचे म्हणणे होते. प्रत्यक्षात मात्र ठाणे जिल्ह्यातील एका बड्या लोकप्रतिनिधीच्या दबावामुळे तातडीने विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची चर्चा आता रंगू लागली आहे,मात्र कोणीही याबाबत जाहीर बोलताना दिसत नाही.

मुख्यमंत्र्यांच्या पुत्राची दुहेरी अडचण, भाजपने फिल्डिंग लावून जाम केलं, ठाकरेंचाही प्लॅन तयार

आगरी कोळी वारकरी भवनवरून शिवसेना आणि मनसेत जुंपली

डोंबिवली व दिव्याच्या मध्यभागी असलेल्या बेतवडे येथे प्रशस्त आगरी कोळी वारकरी भवन उभारण्यात येणार आहे. या वास्तूचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे. याच वारकरी भवनाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि मनसे नेत्यांमध्ये जुंपली आहे. आगरी कोळी वारकरी भवन स्वखर्चातून बांधू ,असे बॅनर लावले. मात्र, त्यांच्या खर्चाची काही तरतूद झालेली दिसत नाही, असे म्हणत युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेत मनसे आमदार राजू पाटील यांना नाव न घेता डिवचले. यालाच मनसे आमदार राजू पाटील उत्तर देत सांगितले की टक्केवारी घेऊन पैसे कमविले नाही. स्वखर्चातून आमच्या वडिलांच्या नावे लवकरच वारकरी भवन उभारू, असे म्हणत म्हात्रे यांना टक्केवारीवरून नाव न घेता डिवचले आहे. त्यामुळे आता शिवसेना आणि मनसे मध्ये जुंपल्याचे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here