म. टा. प्रतिनिधी, पुणे: ‘मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा की नाही, कधी करायचा हा सर्वस्वी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे; परंतु, कदाचित वीस जणांचे छोटे मंत्रिमंडळ त्यांना पुरेसे वाटत असावे. महिलांना मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व न देणेही त्यांना योग्य वाटत असावे,’ असा टोला राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सोमवारी राज्य सरकारला लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीनंतर पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. शिंदे-फडणवीस यांच्या सातत्याने मुंबई दिल्ली वाऱ्या सुरू आहेत. त्याविषयी विचारले असता, ‘कोणी कुठल्याही वाऱ्या करो, दिल्ली, सुरत किंवा गुवाहाटीचीही वारी करो, आम्हाला त्याचे काही देणे घेणे नाही. आम्हाला ज्ञानोबा-तुकोबांची वारी महत्त्वाची आहे,’ असा टोलाही पवार यांनी लगावला.

ओबीसी आरक्षणावरून भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर व विशेषतः राष्ट्रवादीवर टीका केली होती, त्या संदर्भात पवार म्हणाले, ‘आम्ही विरोधी पक्षात असल्याने सत्ताधाऱ्यांनी आमच्याबद्दल चांगले बोलावे, अशी अपेक्षाच आम्ही करीत नाही. ओबीसींना आरक्षण मिळावे, यासाठी महाविकास आघाडीनेच प्रयत्न केले. मध्य प्रदेश सरकारने केलेल्या व सर्वोच्च न्यायालयात टिकलेल्या तरतुदींचा अभ्यास केला. बांठिया आयोग नेमला. त्यांच्या अहवालाला अनुसरून भूमिका मांडली. आमच्यावर आरोप करताना तुमचे सरकार आल्यानंतर अकरा महिन्यांत तुम्ही काय केले, हे स्पष्ट करावे.’

महाविकास आघाडीत तीन पक्ष आहेत. निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने आपापल्या पक्षाचा आढावा कसा घ्यायचा हा ज्या त्या पक्षाचा प्रश्न आहे. त्याप्रमाणे ते कार्यवाही करतील. एकत्र घ्यायचे निर्णय हे महाविकास आघाडीच्या बैठकीत घेतले जातील.

अजित पवार, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस

स्थापनादिनाच्या तयारीचा आढावा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनादिनानिमित्त नगर जिल्ह्यात होणाऱ्या मेळाव्याच्या तयारीचा आढावाही अजित पवार यांनी घेतला. पुणे, नगर, नाशिक, बीडमधून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते मेळाव्याला येतील, याचे नियोजन करण्याच्या सूचनाही पवार यांनी आमदार सुनील टिंगरे व चेतन तुपे यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना केल्या.
Pune Loksabha: पुण्यातील लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वसंत मोरेंचं नाव चर्चेत; तात्यांनी थेट जनतेचाच कौल मागितला

‘कानाखाली जाळ काढीन’

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत कार्यकर्त्यांचे कान टोचले. ‘तुम्हाला पदे दिली आहेत. पदासाठी भांडायचे नाही. नाहीतर एकेकाच्या कानाखाली जाळ काढीन,’ असा दम अजित पवार यांनी भरला. ‘तुमच्या भांडणांमुळे तुमची बदनामी नाही तर पक्षाची, पवारसाहेबांची बदनामी होते. हा काय फाजिलपणा सुरू आहे,’ असा सवालही अजित पवारांनी केला. ‘असेच वागत राहिलात तर मी टोकाची भूमिका घेईन, पदाचा राजीनामा घेईन,’ असेही पवार यांनी सुनावले.
हर हर महादेव! छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आकाश ठोसर, आता लागणार कस

तीन मतदारसंघांचा आढावा

‘मंगळवारी पुण्यातील जालना, शिरूर आणि भिवंडी मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. अनिल देशमुख, प्रफुल्ल पटेल सोमवारी येऊ न शकल्याने विदर्भातील जागांचा आढावा आता १४ जून रोजी मुंबईतील राष्ट्रवादी भवन येथे घेण्यात येईल,’ असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

शिंदे-शहांमध्ये दिल्लीत खलबतं; पण भाजप नेत्याकडून शिवसेना खासदारावर गद्दारीचा शिक्का, युतीत तणाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here