वाशिम: राज्यातील सर्वच राजकीय पक्ष आता लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले असून २०२४ साठी उमेदवारांची चाचपणी करत आहेत. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विद्यमान खासदार भावना गवळी यांना शह देण्यासाठी फिल्डिंग लावली जात आहे. यासाठी माजी मंत्री संजय देशमुख यांनी तयारी सुरू केली असून येत्या ११ तारखेला त्यांच्या नेतृत्वाखाली यवतमाळमध्ये कार्यकर्ता हुंकार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे. या अनुषंगाने आज वाशिममध्ये पदाधिकऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत त्यांनी शिवसैनिकांना मेळाव्यालाही उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी २०१९मध्ये आम्ही जिंकलेल्या १८ लोकसभा मतदारसंघात शिवसेना निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे. तर ठाकरे गटाकडून शिंदे गटात गेलेल्या खासदारांना घेरण्यासाठी उमेदवारांची चाचपणी सुद्धा केली जात आहे. अशातच यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी यांच्याविरोधात तुल्यबळ उमेदवार देण्याची ठाकरे गटाची तयारी सुरू आहे. त्यासाठी माजी मंत्री संजय देशमुख व पोहरादेवी गडाचे महंत सुनील महाराज लढतीसाठी इच्छुक आहेत. देशमुखांनी तर जोरदार तयारी सुरू केली आहे. संजय देशमुख हे दिग्रस विधानसभेचे आमदार होते. तसेच २००२ ते २००४ या काळात ते मंत्रीही राहिले आहेत. पूर्वी ते काँग्रेसमध्ये होते. शिवसेनेच्या संजय राठोड यांनी त्यांचा पराभव केला होता. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सुरुवातील ते संजय राठोड यांच्याविरोधात ते निवडणूक लढतील, असा अंदाज बांधला जात होता. मात्र त्यांनी दिग्रसच्या बाहेर पडून बैठका घ्यायला सुरुवात केली आहे. अगदी वाशिममध्ये येऊन त्यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे.

सप्टेंबरपर्यंत सरकार कोसळण्याचा दावा, टक्केवारीचे आरोप अन् २०२४ साठी खुलं आव्हान; खैरै अन् भुमरेंमध्ये जुंपली

Ajit Pawar : शिंदे फडणवीस सरकारच्या वर्मावर बोट, अजित पवारांनी मंत्रिमंडळ विस्तारावरुन सगळं काढलं, म्हणाले..

महंत सुनील महाराजही इच्छुक

संजय राठोड यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर बंजारा समाजाचे महत्वाचे नेते व पोहरादेवी गडाचे महंत सुनील महाराज यांनी उद्धव ठाकरे यांना साथ देण्याचा निर्णय घेऊन पक्षप्रवेश केला होता. आता ते लोकसभा निवडणुकीची तयारी करत आहेत. मतदारसंघात बंजारा समाजाचे प्राबल्य पाहता येथून बंजारा उमेदवार दिल्यास भावना गावळींचा पराभव करणे शक्य आहे, असा कयास त्यांच्या समर्थकांकडून लावला जात आहे. संजय देशमुखांच्या तयारीविषयी त्यांची प्रतिक्रिया घेतली असता सुनील महाराज म्हणाले, ‘आम्ही दोघेही पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. निवडणुकीला अजून वेळ आहे. मात्र उद्धव ठाकरे ज्यांना उमेदवारी देतील, त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू आणि उमेदवाराला निवडून आणू. उद्धव ठाकरेंनी आदेश दिल्यास मीही लढण्यास तयार आहे. सर्व समाजातील लोक माझ्याबरोबर आहेत.’

दरम्यान, सुनील महाराज हे पोहरादेवी गडाचे महंत असून ते गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. याआधी ते वाशिम जिल्हा परिषदेचे सदस्य राहिले आहेत. सर्वच राजकीय पक्षातील नेते मंडळींसोबत त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीला एक वर्षापेक्षाही कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवणार असल्याचे सर्वच नेते सांगत आहेत. मात्र जागा वाटपाचा मुद्दा आघाडीत बिघाडी तर करणार नाही, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

काँग्रेसकडूनही प्रयत्न सुरू

गेल्या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागलेले काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनीही पुन्हा तयारी सुरू केली आहे. त्यांना शिवसेना व राष्ट्रवादीची साथ मिळाल्यास आपण निश्चित विजयी होऊ, असा विश्वास वाटत आहे. त्यांनीही मतदारसंघात भेटीगाठी सुरू केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here