नागपूर : बैतूलहून नागपूरकडे येणाऱ्या वृद्ध महिलेचा रेल्वेस्थानकावर अपघात झाल्याची घटना घडली. चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना वृद्ध महिलेचा पाय घसरला आणि ती ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या मधल्या जागेत अडकली. तिथे उपस्थित असलेल्या आरपीएफ अधिकाऱ्याने धावत जाऊन ट्रेनची चेन ओढली.यानंतर त्या महिलेला बाहेर काढण्यात आले. मात्र, या अपघातात महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Odisha Accident: त्या मार्गावर पहिली ट्रेन धावली, अपघाताचं दृश्य पाहून प्रवासी ‘जगन्नाथ, जगन्नाथ’ पुटपुटत राहिले
गाडी क्रं.(१२७२२) दक्षिण एक्सप्रेस रविवारी दुपारी ३.४५ वाजता फलाट क्रमांक २ वरून आमलाहुन नागपूरसाठी रवाना झाली. एक वृद्ध महिला प्रवासी या चालू ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होती. गडबडीत तिचा पाय घसरला आणि तोल जाऊन रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मधील जागेत अडकली. रेल्वे पोलिस दलाचे उपनिरीक्षक शिवराम सिंह त्या ठिकाणी तैनात होते. हा प्रकार पाहताच त्यांनी धावत जाऊन ट्रेनची चेन ओढली आणि ट्रेन थांबवली. यानंतर सहायक उपनिरीक्षक एस.एन.यादव आणि पोलीस हवालदार हरमुख गुर्जर यांना पाचारण करण्यात आले. प्रवाशांच्या मदतीने प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमध्ये अडकलेल्या वृद्ध महिलेला बाहेर काढण्यात आले.

बुधनीबाई धनसाई पटेल असे या महिलेचे नाव असून तिचे वय ७० वर्षे आहे. ती छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यातील रोगरा येथील रहिवासी आहे. ही महिला तिच्या कुटुंबातील सदस्य आणि ग्रामस्थांसह बैतूलमध्ये रामपाल महाराजांच्या सत्संगाला गेली होती.यानंतर ती दक्षिण एक्सप्रेसने घरी परतत होती. ट्रेनच्या जनरल डब्यात गर्दी असल्याने ती स्लीपर डब्यात जाऊन बसली.

ट्रेन अपघातात पूर्ण कुटुंब संपलं; भरपाईत १० लाख मिळाले; ओक्साबोक्शी रडत बिनोद काय म्हणाला?
आमला येथे पोहोचल्यावर जनरल डब्यात जाण्यासाठी ट्रेन खाली उतरली. महिला जनरल डब्यात पोहचण्याआधीच ट्रेन सुरू झाली. त्यामुळे महिलेने पुन्हा स्लीपर डब्यात जाण्याच्या प्रयत्न केला. या दरम्यान तिचा पाय घसरला,आणि तोल गेला. यामुळे ती महिला गाडी आणि फलाटाच्या मधल्या फटीत पडली. या अपघातात तिच्या डाव्या पायाला दुखापत झाली. बराच वेळ रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने पोलीस उपनिरीक्षक शिवराम सिंह यांनी एक खासगी रिक्षा बोलावून आमला येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे दक्षिण एक्सप्रेसला आमला स्थानकात उशीर झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here