बालासोर, ओडिशा : ओडिशाच्या बालासोरमध्ये झालेल्या भीषण रेल्वे दुर्घटनेला आज तीन दिवस झाले. अतिशय भीषण अशा या दुर्घटनेत २७५ प्रवाशांचा मृत्यू झाला तर १२०० हून अधिक जखमी झाले. अपघात इतका भीषण होता की मृत्यू झालेल्या अनेक प्रवाशांची अद्याप ओळख पटलेली नाही. त्यांची ओळख पटवण्याचं मोठं आव्हान बालासोर प्रशासनासमोर आहे. ओडिशातील या दुर्घटनेत अनेकांसाठी देवदूत ठरले ते मराठमोळे अधिकारी दत्तात्रय शिंदे. दत्तात्रय शिंदे हे बालासोरचे जिल्हाधिकारी आहेत. जून २०२२ मध्ये त्यांनी जिल्हाधिकारीपदाची सूत्र घेतली.बालासोरमधील भीषण दुर्घटनेनंतर तेथील रेल्वेवाहूतक पूर्ववत झाली आहे. ही रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्यासाठी रेल्वेचे १००० कामगार अविश्रांत काम करत होते. ५१ तासांत ही रेल्वे वाहतूक पूर्ववत झाली. पण बालासोरमधील या भीषण अपघातातील जखमींना आणि उद्ध्वस्त कुटुंबाला आधार दिला मराठमोळे अधिकारी दत्तात्रय शिंदे यांनी. दत्तात्रय शिंदे हे बालासोरचे जिल्हाधिकारी आहेत. आणि त्यांच्याच नेतृत्वात अपघातानंतर तातडीने बचावकार्य हाती घेण्यात आलं आणि जखमींना उपचार दिले गेले.

काय म्हणाले दत्तात्रय शिंदे?

रेल्वे अपघातानंतर आपत्तीव्यवस्थापनांचं मोठं आव्हान होतं. कारण या अपघातात शेकडो प्रवासी जखमी झाले होते. तर अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला होता. यावेळी अडकलेल्या आणि जखमी असलेल्या अनेक प्रवाशांच्या मदतीला पहिला हात पोहोचला तो दत्तात्रय शिंदे यांचा. ओडिशा आपत्ती व्यवस्थापन हे जगभर चर्चेत आहे. कारण या व्यवस्थापनात एकाही व्यक्ती मृत्यू होऊ द्यायचा नाही, हे मुख्य लक्ष्य असतं, असं जिल्हाधिकारी दत्तात्रय शिंदे म्हणाले. तसंच जे हवं ते सरकारकडून उपलब्ध करून दिलं जातं, यामुळे वेगाने काम करण्यास मोकळीक मिळते, असं ते म्हणाले.

ओडिशात भीषण रेल्वे अपघात का झाला? CBI कडे तपास येताच धक्कादायक माहिती उघड, वेगळाच अँगल समोर
ज्यावेळेस अपघात झाल्याचं कळलं त्यानंतर पाउण तासात घटनास्थळी होतो. त्यावेळी मोठ्या प्रमाणावर रुग्णवाहिका, डॉक्टर आणि स्वयंसेवकांची मोठी गरज होती. याची सर्व माहिती मी सरकारला दिली आणि एका तासात १०० रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या. इतर ठिकाणचे डॉक्टर्स होते त्यांना पाठवण्यात आलं. बरेचसे स्वयंसेवक तिथे होते. यावेळी मृतदेह बाहेर काढण्याऐवजी तुम्ही जखमींना तातडीने बाहेर काढा. म्हणजे जास्तीत जास्त लोकांना वाचवता येईल, अशा सूचना स्वयंसेवकांना दिल्या, अशी माहिती दत्तात्रय शिंदे यांनी दिली.

कोरोमंडल एक्सप्रेसच्या भीषण अपघातानंतर ५१ तासांनी स्थिती पूर्ववत, पहिली ट्रेन रवाना

इथली बहुतेक सर्व रुग्णालये कायम सुसज्ज असतात. सगळ्या रुग्णालयांमध्ये तातडीने आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. विशेष म्हणजे त्या मोफत दिल्या जातात. घटनास्थळी पोहोचल्यावर आम्ही काही निर्णय घेतले आणि रणनीती बदलली. मृतदेह हे शेजारीच असलेल्या बहानगा हायस्कूलमध्ये ठेवण्यात आले आहे. आणि तिथेच शवविच्छेदन करण्यात आलं. यामुळे जो प्रवासी गंभीर जखमी होता त्याला थेट रुग्णालयात पोहोचवून तातडीने उपचार देण्यात आले, अशी माहिती दत्तात्रय शिंदे यांनी दिली.

हैदराबादमधून एक व्यक्ती आली होती. आणि त्यांची मुलगी आणि पत्नी ट्रेनने प्रवास करत होते. सर्व मृतदेहांचे आमच्याकडे फोटो आहेत. आणि त्याची यादी आम्ही केली आहे. यामुळे त्यांना त्यांची पत्नी मिळाली. पण मुलगी सापडत नव्हती. आम्ही राज्याच्या नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्या मुलीचा फोटो पाठवला. तिचा शोध लागला आणि तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. त्यांना एक धक्का बसला असला तरी त्यांची मुलगी वाचवण्याचा आम्ही प्रयत्न केला, असं दत्तात्रय शिंदे यांनी सांगितलं.

घटनेनंतर काही वेळापूर्वी आपल्याला स्फोट झाल्याची माहिती फोनवरून मिळाली होती. इतका मोठा आवाज झाला होता की तो स्फोट असावा, असं माहिती देणाऱ्याला वाटलं. पण असं काही नव्हतं. भीषण अपघातामुळे खूप मोठा आवाज झाला होता. घटनास्थळी पोहोचल्यावर भीषण अपघात झाल्याचं दिसलं.

या घटनेतील ११०० हून अधिक जखमींपैकी ९०० जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. जवळपास २०० जणांवर अजूनही उपचार करण्यात येत आहे. अजूनही मृतांपैकी १०१ जणांची ओळख पटलेली नाही, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे. दरम्यान या अपघातात ४० जणांचा मृत्यू हा विजेचा झटक्याने झाल्याचं समोर आलं आहे.

दत्तात्रय शिंदे नगर जिल्ह्यातले

दत्तात्रय शिंदे यांनी २०१६ला यूपीएससी परीक्षेत बाजी मारली. ते देशात ३७७ व्या रँक आले होते. अहमदनर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील वडगाव सावतळ हे त्यांचं मूळ गाव. प्राथमिक शिक्षण टाकळी ढोकेश्वरला झालं. त्यानंतर नगरला १०वी पर्यंत शिक्षण झालं. पुण्यात ११वी आणि १२वी सायन्स केलं. मग फर्ग्युसनमधून बीए केलं. आणि २०११ मध्ये यूपीएसची अभ्यास सुरू केला आणि २०१६ ला यशस्वी झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here