अधिकाऱ्यांनी महिलेचा ठावठिकाणा विचारला. ती बडांबा परिसरातून आली होती. यानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बडांबा पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. बडांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकाही व्यक्तीचा ओडिशातील रेल्वे अपघातात मृत्यू झाला नसल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी महिलेची चौकशी केली. रेल्वेकडून मिळणाऱ्या भरपाईसाठी तिनं मृतदेहावर खोटा दावा सांगितल्याचं धक्कादायक सत्य चौकशीतून उघडकीस आलं.
नेमकं काय घडलं?
कट्टकच्या बरांबा परिसरात राहणारी ४० वर्षांच्या गीतांजली दत्ता बालासोरमधील उत्तर ओडिशा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री बिझनेस पार्कमध्ये उभारण्यात आलेल्या शवागारात पोहोचल्या. या ठिकाणी रेल्वे अपघातातील मृतदेह ठेवण्यात आले आहेत. मृतांचे कुटुंबीय, नातेवाईक येथे येऊन आपल्या आप्तांचा शोध घेत आहेत. मृतदेहांची ओळख पटवण्याचं आणि ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्याचं काम इथे सुरू आहे.
‘अपघातात जवळची व्यक्ती गमावलेले अनेक जण शवागाराजवळ पोहोचले होते. त्यांच्या तुलनेत गीतांजली दत्ता शांत वाटत होत्या. शवागाराबाहेर लावण्यात आलेल्या मृतांचे काही फोटो त्यांनी पाहिले. तिनं एका फोटोवर हात ठेवला आणि हाच आपला पती असल्याचं सांगितलं,’ अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिकास कुमार पलेई यांनी दिली.
पोलिसांनी गीतांजली यांच्याकडे ओळखपत्रांची मागणी केली. त्यांनी आधार कार्ड दाखवलं. त्यावर त्यांच्या पतीचं नाव बिजय दत्ता होतं. त्यानंतर महिलेनं स्वत:चं आधार कार्ड दाखवलं. तिनं केलेला दावा पडताळून पाहण्यासाठी गीतांजली वास्तव्यास असलेल्या बरांबा पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्यात आला. तासाभरानंतर बरांबा पोलिसांनी पोलीस निरीक्षक बिकास कुमार पलेई यांच्याशी संपर्क साधत गीतांजली यांचे पती जिवंत असल्याची माहिती दिली. यानंतर महिलेनं तिथून पळण्याचा प्रयत्न केला.
ओडिशा दुर्घटनेतील जवळपास १०० मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यामुळे मृतदेहांवर खोटे दावे सांगून भरपाई लाटण्याचे प्रकार घडू शकतात. त्यामुळे ओडिशा सरकारनं पोलीस आणि रेल्वे प्रशासनाला महत्त्वाचे आदेश दिले आहेत. ‘मृतदेहांवर खोटे दावे सांगण्याचे प्रकार घडू शकतात. त्यामुळे योग्य काळजी घ्या आणि असे दावे सांगणाऱ्यावर कठोर कारवाई करा,’ असं ओडिशा सरकारनं आदेशात म्हटलं आहे. यासंबंधी मुख्य सचिव प्रदिप कुमार जेना यांनी ट्विट केलं असून त्यात ओडिशाचे डीजीपी, भुवनेश्वर महापालिका आणि रेल्वे मंत्रालयाला टॅग केलं आहे.