पुढील ३ ते ४ तासात जळगाव, नाशिक, अहमदनगर, छ. संभाजीनगर या जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह वादळी पावासाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या भागात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, ३० ते ४० किमी प्रतितास या वेगाने वादळी वारे वाहतील, असाही इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडताना काळजी घ्यावी, असं आवाहन हवामान विभागाने केलं आहे.
दरम्यान, अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाल्याची माहिती आहे. गेल्या तीन तासांत या चक्रीवादळाचा वेग हा ११ किलोमीटर प्रतितास इतका झाला आहे. हे चक्रीवादळ आता उत्तरेच्या दिशेने पुढे सरकत असल्याची माहिती आहे. जसं जसं हे चक्रीवादळ पुढे सरकेल तसा पुढील १२ तासात त्याचा वेग आणखी वाढेल, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
चक्रीवादळ खोल समुद्रात असल्याने मुंबईसह कोकण किनारपट्टीवर फार पावसाची शक्यता नाही, असंही हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. तरी, चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मच्छिमारांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. मच्छिमारांनी खोल समुद्रात मच्छिमारीसाठी जाऊ नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.
पुढील २४ तासांत हे चक्रीवादळ उत्तरेच्या दिशेने पुढे सरकेल. पूर्वमध्य अरबी समुद्रात आणि दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात सध्या ही स्थिती निर्माण झाली आहे. मुंबईपासून ११२० किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे, अशी माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसळीकर यांनी ट्विट करून दिली आहे.