एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले की, ‘दिनेश कुमार शर्मा (७३) हे १९७५ बॅचचे आयपीएस अधिकारी असून त्यांनी विशाल खांड येथील त्यांच्या घरी स्वत:वर गोळी झाडून घेतली. मंगळवारी सकाळी त्यांचा मृतदेह त्यांच्या खोलीत आढळून आला’. पोलिसांनी खोलीतून सुसाईड नोटही जप्त केली आहे.
माजी आयपीएस दिनेश शर्मा यांनी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये लिहिले की, ‘मी आत्महत्या करत आहे कारण मला चिंता आणि नैराश्य सहन होत नाहीये. माझी ताकद कमी होते आहे आणि प्रकृतीही खालावत चालली आहे. यासाठी कोणीही जबाबदार नाही’. सुसाईड नोट लिहिल्यानंतर त्यांनी आपल्या रिव्हॉल्वरने थेट डोक्यात गोळी झाडून घेतली. त्यांचं रिव्हॉल्व्हरही खोलीतच सापडले आहे. माजी अधिकाऱ्याचा मृतदेह खुर्चीवर सापडल्याचं पोलिसांनी सांगितलं.
सकाळी अचानक दिनेशकुमार शर्मा यांच्या खोलीतून गोळीबाराचा मोठा आवाज आला. यानंतर कुटुंबीयांनी त्यांच्या खोलीकडे धाव घेतली, तिथे ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल नेण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सुसाईड नोटवरुन त्यांनी आजारपण आणि त्यातून आलेल्या नैराश्याला कंटाळून हे टोकाचं पाऊल घेतल्याचं कळतं. दुसरीकडे, त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच त्यांचे जवळचे नातेवाईकही घरी पोहोचत आहेत.
माजी आयपीएस अधिकारी दिनेश शर्मा हे डिप्रेशनवर उपचार घेत होते. ते २०१० मध्ये यूपी पोलिसच्या डीजी या पदावरुन निवृत्त झाले होते.