त्याला कसं वाचवण्यात आलं याची कहाणी अंगावर काटा आणणारी आहे. अपघातानंतर बचाव कार्यात गुंतलेल्या १००० जणांची टीम थकली होती. अपघाताला ४८ तास उलटून गेले होते. शोध मोहीम मागे घेण्यात आली होती. तसेच, हा ट्रॅक रेल्वेसाठी खुला करण्यात येणार होता. तेवढ्यात अचानक हलणाऱ्या झुडपांकडे पथकाची नजर गेली. त्यांनी तिथे जाऊन पाहिले असता त्यांना हा जखमी व्यक्ती दिसला. हे सारं तेव्हा घडलं जेव्हा पथकाने आता कोणी जिवंत सापडेल याची आशा सोडून दिली होती. पण, ते म्हणतात ना, ज्याला देव तारी त्याला कोण मारी. असंच या प्रवाशासोबत घडलं.
कोरोमंडल एक्स्प्रेसची एक बोगी दाट झाडा-झुडपांमध्ये उलटून पडली होती. त्यातील हा प्रवाशी झुडपांमध्ये दबला गेला होता. जेव्हा त्याला जिवंत बाहेर काढण्यात आलं तेव्हा रेस्क्यू टीम सुद्धा आश्चर्यचकित झाली होती की, एवढ्या भयंकर ट्रेन अपघाताच्या ४८ तासांनंतरही कोणी कसं जिवंत राहू शकतं.
बालासोर रुग्णालयात दाखल
बचाव पथकाने सांगितले की, त्या व्यक्तीला सोरो येथील कम्युनिटी सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आणि तेथून त्यांना बालासोर जिल्हा मुख्यालय रुग्णालयात पाठवण्यात आले. आसाममधील ३५ वर्षीय दुलाल मजुमदार असे या व्यक्तीचे नाव आहे.
चार लोकांसह कोरोमंडलमध्ये प्रवास करत होता
दुलालने सांगितले की, ते इतर पाच साथीदारांसह कोरोमंडल एक्स्प्रेसमध्ये प्रवास करत होते. त्याच्या इतर ४ साथीदारांचे काय झाले हे त्याला माहित नाही. अपघात झाला तेव्हा ते कोरोमंडल एक्स्प्रेसच्या जनरल डब्यात होते. ट्रेनच्या धडकेनंतर ते उडी मारुन झाडीत पडले असावे, असा अंदाज आहे. तो दोन दिवसांपासून जिवंत राहिला हा एक चमत्कारच म्हणावा लागेल.