म. टा. प्रतिनिधी, पुणे : मध्य पूर्व अरबी समुद्रात ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाची निर्मिती झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) मंगळवारी जाहीर केले. पुढील दोन दिवसांत उत्तरेकडे सरकताना वादळाची तीव्रता वाढत जाणार असल्याचेही ‘आयएमडी’ने म्हटले आहे.

आग्नेय अरबी समुद्रातील सोमवारच्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता २४ तासांमध्ये डिप्रेशन, डीप डिप्रेशनवरून चक्रीवादळापर्यंत पोचली. सध्या अरबी समुद्राचे तापमान सरासरीपेक्षा जास्त असल्याने वादळाला मोठी ऊर्जा मिळत असल्याचे हवामान शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. ‘आयएमडी’ने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी मध्य पूर्व अरबी समुद्रात ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाची निर्मिती झाली. बांगलादेशाने वादळाला दिलेल्या ‘बिपरजॉय’ या नावाचा अर्थ आपत्ती असा होतो. सध्या वादळ मुंबईपासून एक हजार किलोमीटर नैऋत्येला असून, ताशी चार किलोमीटर वेगाने त्याचा उत्तरेकडे प्रवास सुरू आहे. पुढील २४ तासांमध्ये बिपरजॉय तीव्र चक्रीवादळाची श्रेणी गाठण्याची शक्यता आहे.

‘बिपरजॉय’ चक्रीवादळ भारताच्या पश्चिम किनारपट्टीपासून दूर असून, त्याचा यापुढील अपेक्षित मार्ग उत्तरेकडे जात असल्याने भारताला या वादळापासून थेट धोका नाही. मात्र, वादळाभोवती फिरणाऱ्या वेगवान वाऱ्यांचा प्रभाव किनारपट्टीला जाणवू शकतो. आठ ते दहा जूनच्या दरम्यान कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्र किनारपट्टीवर ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. या काळात समुद्रही खवळलेला राहण्याची शक्यता असल्याने या क्षेत्रात मासेमारीसाठी कोणीही जाऊ नये, अशी सूचना ‘आयएमडी’ने दिली आहे.

Cyclone Biperjoy: मुंबईसह कोकण किनारपट्टीला अलर्ट! चक्रीवादळ येणार, अरबी समुद्रात मोठी घडामोड
मान्सूनवर प्रभाव

बिपरजॉय चक्रीवादळाचा मान्सूनच्या केरळमधील आगमनावरही परिणाम होऊ शकतो, असे ‘आयएमडी’चे म्हणणे आहे. आग्नेय अरबी समुद्र आणि केरळच्या दरम्यान पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांच्या प्रवाहाने साडेचार किलोमीटरची अपेक्षित उंची गाठली असून, मान्सूनच्या आगमनासाठी आता फक्त सर्वदूर आणि सलग पावसाची प्रतीक्षा आहे. वादळ उत्तरेकडे सरकल्यानंतर, केरळमध्ये पावसाला सुरुवात होईल, तेव्हा मान्सूनचे आगमन जाहीर करण्यात येईल, असे ‘आयएमडी’मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

भल्या भल्यांना घाम फोडणाऱ्या बिबट्याने चक्क चोरली चप्पल

चक्रीवादळाची निर्मिती का, कशी?

अरबी समुद्रातील बिपरजॉय चक्रीवादळाच्या निर्मितीबाबत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटीओरोलॉजीमधील (आयआयटीएम) वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रॉक्सि कोल म्हणाले, ‘अरबी समुद्राचे तापमान सध्या ३१ ते ३२ अंश सेल्सिअस इतके नोंदले जात आहे, जे सरासरीपेक्षा दोन ते चार अंशांनी अधिक आहे. याच काळात मान्सूनच्या प्रवाहाला जोर न येणे आणि मेडन ज्युलियन ऑस्सीलेशन (एमजेओ) हे ढगांचे क्षेत्र हिंदी महासागरावर येणे या बाबींच्या एकत्रित परिणामामुळे अरबी समुद्रात चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. समुद्राच्या तापमानातील वाढीचा थेट संबंध हवामान बदलांशी जोडला जातो. कमी वेळात वादळाची तीव्रता वाढणे हा देखील त्याचाच परिणाम म्हणता येईल.’

Cyclone Prediction: कोकण किनारपट्टीला चक्रीवादळाचा धोका? हवामान विभागाचं मात्र सावधगिरीचं आवाहन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here