अमित शहा, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा व राष्ट्रीय संघटनमंत्री बी. एल. संतोष यांच्या उपस्थितीत भाजपची उच्चस्तरीय बैठक सोमवारी रात्री उशिरा सुमारे चार तास आणि मंगळवारी सकाळपासून सहा तास चालली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत विविध राज्यांतील भाजप पक्षसंघटनेतील रिक्त पदे भरण्यावर चर्चा झाली. अनेक राज्यांत दीर्घकाळापासून असलेल्या पदाधिकाऱ्यांना बदलण्याबाबतही या बैठकीत गंभीरपणे चर्चा झाली. भाजप नेते व संघनेते यांच्यातही लवकरच संयुक्त बैठक होईल, अशीही माहिती ‘महाराष्ट्र टाइम्स’ला समजली आहे. सी. टी. रवी हे भाजपचे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत. मात्र, अलीकडे कर्नाटक विधानसभा निवडणुकीत संतोष यांच्यासह त्यांचीही भूमिका वादग्रस्त ठरली होती. त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्याचाही मोठा प्रश्न असून, महाराष्ट्रासारख्या राज्यातील भाजप प्रभारी हे ‘दिवसाचे चोवीस तास आणि आठवड्याचे सात दिवस’ काम करणारे, करू शकणारेच हवेत यावर भाजप नेतृत्वाचे एकमत झाले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही याबाबत शहा यांनी चर्चा केली आहे. रवी यांना लवकरच महाराष्ट्राच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची शक्यता वर्तविली जाते.
मुंबई भाजपमध्येही फेरबदल?
भाजपमध्ये प्रदेश स्तरावर भाकरी फिरवण्याचा प्रयोग होणार असतानाच निवडणुका तोंडावर आलेल्या मुंबई भाजपमध्येही मोठे संघटनात्मक बदल होऊ घातल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यादृष्टीनेही काही निर्णय अपेक्षित असल्याचे बोलले जात आहे. या प्रदीर्घ महामंथनात मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल देशभरात सुरू असलेल्या जनसंपर्क अभियानाचा आढावा घेण्यात आला व खासदार आणि भाजप प्रदेशाध्यक्षांकडून आलेल्या कार्य अहवालांवरही वरिष्ठ पक्षनेत्यांनी चर्चा केली.
‘भाजपविरोधी आघाडीचे प्रयत्न आशादायक नाहीत’
‘देशातील कोणता पक्ष जातीयवादाला खतपाणी घालत आहे, हे सांगणे कठीण आहे; तसेच २०२४च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी राष्ट्रीय पातळीवर भाजपविरोधी आघाडी तयार करण्याचे प्रयत्नही फारसे आशावादी वाटत नाहीत,’ असे धर्मनिरपेक्ष जनता दलाचे सर्वेसर्वा माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी मंगळवारी म्हटले. त्यामुळे धर्मनिरपेक्ष जनता दल भाजपविरोधी ऐक्याचा भाग असण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
‘देशात असा एकतरी पक्ष आहे का, ज्यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे भाजपशी संबंध नाही,’ असा प्रश्न देवेगौडा यांनी उपस्थित केला. ‘मी या देशाच्या राजकारणाचे तपशीलवार विश्लेषण करू शकतो. मात्र, त्याचा नेमका उपयोग काय? मला असा एक पक्ष दाखवा ज्याचा भाजपशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध नाही,’ असे ते म्हणाले. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार राष्ट्रीय पातळीवर भाजपविरोधी आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असून, त्या संदर्भातील प्रश्नावर देवेगौडा यांनी त्यांच्या भूमिकेची मांडणी केली.