Mumbai Special Court Hearing On Shiv sena Workers Agitation : मुंबईतील विशेष कोर्टात २००५ च्या एका प्रकरणात सुनवणी झाली. या खटल्यासाठी शिवसेनेतून फुटलेल्या नेत्यांवर कोर्टात हजर राहण्याची वेळ आली. या सुनावणीवेळी न्यायाधीशांनी केलेल्या टिप्पणीने सर्वांना हसू आलं.

 

shiv sena workers agitation
‘इथं तरी तुमच्यात एकमत झालं!’ न्यायाधीशांच्या टिप्पणीने फाटाफूट झालेल्या राजकीय नेत्यांत हशा
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : नारायण राणे व राज ठाकरे यांच्या बंडानंतर शिवसेनेत झालेली फाटाफूट आणि गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर पुन्हा पडलेली फूट यामुळे दुभंगलेल्या मूळ शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर मंगळवारी एका खटल्याच्या निमित्ताने विशेष न्यायालयात आरोपी म्हणून एकत्र हजर राहण्याची वेळ आली. त्या वेळी विशेष न्यायाधीश राहुल रोकडे यांनी आरोप निश्चित करून ते मान्य आहेत का, अशी विचारणा करताच सर्वांनी एकमुखाने नकारार्थी उत्तर दिले. ते ऐकून, ‘चला, निदान इथं तरी तुमच्यात एकमत झालं’, अशी मिश्किल टिप्पणी न्यायाधीशांनी करताच संपूर्ण न्यायालयात एकच हशा पिकला आणि धीरगंभीर न्यायालयातील वातावरणही काही काळ हलकेफुलके झाले.जुलै २००५मध्ये शिवसेना पक्षाला रामराम ठोकून काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याच्या तत्कालीन शिवसेना नेते नारायण राणे यांच्या निर्णयानंतर त्यांच्या समर्थकांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘दैनिक सामना’च्या कार्यालयाजवळ सभा आयोजित केली होती. त्या वेळी शिवसेनेतच एकत्र असलेले सदा सरवणकर, बाळा नांदगावकर, अनिल परब व अन्य नेत्यांनी कार्यकर्त्यांसह जमून सभा उधळून लावण्यासाठी आंदोलन केले होते. त्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला होता. त्यात अनेक जण जखमीही झाले होते. या घटनेनंतर दादर पोलिसांनी गुन्ह्यांच्या वेगवगळ्या घटनांबाबत एकूण ४८ जणांविरोधात पाच एफआयआर नोंदवले. ४८पैकी दहा आरोपींचे यापूर्वीच निधन झाले असल्याने सध्या या खटल्यात ३८ आरोपी आहेत.
Shinde vs Thackeray : ठाकरे गटाला लवकरच खिंडार पडणार, उद्धव यांना आव्हान देत श्रीकांत शिंदेंचं मोठं वक्तव्य
दादर पोलिसांनी तपासाअंती दाखल केलेल्या आरोपपत्राप्रमाणे मुख्य सरकारी वकील जयसिंग देसाई यांनी आरोपनिश्चितीचे प्रारूप सादर केल्यानंतर या ३८ आरोपींवरील आरोपनिश्चिती प्रलंबित होती. अनेक आरोपी नेते वारंवार गैरहजर राहत असल्याने न्यायाधीशांनी सर्वांना अखेरची संधी दिली होती. त्यामुळे मंगळवारच्या सुनावणीला बहुतांश सगळे हजर राहिले. त्यानंतर दंगल करणे, बेकायदा जमाव जमवणे, जमावबंदीचा आदेश मोडणे, सरकारी सेवकांना कर्तव्यापासून रोखणे, अशा विविध आरोपांबाबत भादंविच्या कलम १४३, १४४, १४५, १४६, १४७, ३५३, ३३२ अन्वये तसेच सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा व महाराष्ट्र पोलिस कायद्याप्रमाणे आरोप निश्चित केले असल्याचे न्यायाधीशांनी त्यांच्यासमोर जाहीर केले. तसेच हे आरोप मान्य आहेत का, अशी विचारणा सर्वांना केली. त्या वेळी आरोप मान्य नाहीत, असे सर्वांनीच एकमुखाने सांगितले. ते पाहून न्यायाधीशांनी वरील मिश्किल टिप्पणी केली. तेव्हा, नेतेमंडळी व त्यांचे वकील, बंदोबस्तासाठी असलेले पोलिस, न्यायालयातील कर्मचारी वर्ग अशा सर्वांमध्ये एकच हशा पिकला आणि संपूर्ण धीरगंभीर वातावरण काही काळ बदलून गेले.

राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदेंचे भाऊ ऋषी शिंदेंच्या हाती एकनाथ शिंदेंचा भगवा

परब, सरवणकर, नांदगावकर यांच्याबरोबरच ज्येष्ठ शिवसैनिक दगडू सकपाळ, श्रद्धा जाधव, किरण पावसकर असे अनेक आरोपी न्यायालयात हजर होते. त्या सर्वांनीच आरोप अमान्य केल्याने आता त्यांच्याविरोधात खटल्याची सुनावणी सुरू होईल. मंगळवारच्या आरोपनिश्चिती प्रक्रियेला संजय बावके, रवींद्र चव्हाण व हरिश्चंद्र सोलकर हे आरोपी गैरहजर राहिल्याने न्यायाधीशांनी त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले. तर, श्रीधर सावंत हे रुग्णालयात दाखल असल्याने त्यांना हजेरी लावण्यासाठी मुदत देण्यात आली. या खटल्याची पुढील सुनावणी आता २१ जून रोजी होईल.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here