भारतात क्रिकेट गुणवत्तेची कमतरता नाही. क्रीडाक्षेत्रात बीसीसीआयचे आर्थिक उत्पन्नही प्रचंड मोठे आहे. सेवासुविधांचा अभाव नसून, गुणवत्तेला खतपाणी घालण्यासाठीही अनेक हात पुढे येतात. शिवाय व्यासपीठही उपलब्ध आहेत. तरीदेखील आयसीसी स्पर्धांमधील हे अपयश सलतेच.
जगज्जेतेपदापर्यंतच्या प्रवासात भारतीय संघ सहा मालिकांना सामोरा गेला. ज्यातील एकच मालिका भारताने गमावली. दक्षिण आफ्रिकेतील त्या मालिकेपासून रोहित शर्माकडे कसोटी संघाचे नेतृत्व आले. विराट कोहलीला हटविण्यात आले. तो खांदेपालट वगळता भारतीय संघ मायदेशात अजेय राहिलाच, तर इंग्लंडमधील मालिका बरोबरीत सोडविण्यात टीम इंडियाला यश आले. या दरम्यान बांगलादेशातील मालिकेत भारताने निसटते का होईना जेतेपद पटकावले.
‘दी ओव्हल’वरील या लढतीचा निकाल भारतास साजेसा लागला नाही, तरी प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा संघासाठी असलेला दृष्टीकोन बदलणार नाही. ‘दोन वर्षे मेहनत घेतल्यानंतर संघ कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीत धडक मारतो. हा प्रवास आव्हानात्मक असतो. कडवे प्रतिस्पर्धी, फिटनेसची परीक्षा आणि मानसिकतेची कसोटी यातून तावून सुलाखून निघालेला संघ अंतिम फेरीपर्यंत येतो. हादेखील मोठा विजयच आहे. ऑस्ट्रेलियातील मालिकाविजय, इंग्लंडमधील बरोबरी; तसेच इतर देशांच्या मैदानांवरील खडतर स्पर्धा… भारतीय संघाने गेल्या पाच-सहा वर्षांत कामगिरी आणि दर्जा प्रचंड वाढविला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत आयसीसी करंडक जिंकला नाही, यावरून भारताला जोखणे चुकीचे आहे,’ असे द्रविड यांनी आधीच स्पष्ट करून संघावरील दडपण कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.
-चुकांमधून धडा घेणे आवश्यक
– भारताने मागील चुकांमधून धडा घेणे आवश्यक आहे. जागतिक कसोटी फायनलच्या गेल्या लढतीत न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघाने पारंपरिक संघनिवडीवर विश्वास ठेवून अंतिम अकरामध्ये दोन फिरकी गोलंदाजांना संधी दिली; मात्र साउदम्पटनच्या मैदानावर तो निर्णय अंगलट आला. आताही टीम इंडियाच्या यशात अंतिम अकराची संघनिवड महत्त्वाची ठरणार आहे.
– फलंदाजीच्या दृष्टिकोनातून रवींद्र जडेजा आणि आर. अश्विन अशा दोन्ही फिरकी गोलंदाजांना खेळविण्याचा मोह भारतीय संघव्यवस्थापनास होतो; मात्र ‘दी ओव्हल’वरील परिस्थितीही लक्षात घ्यायला हवी. दक्षिण लंडनमध्ये आताकुठे उन्हाळ्याला सुरुवात होत असून, खेळपट्ट्या ताज्या आहेत. अशा वेळी तीनऐवजी चार वेगवान गोलंदाज खेळविणे फायद्याचे ठरू शकते.
– ऋषभ पंतसारखा कसोटीतील भरवशाचा यष्टीरक्षक-फलंदाज सध्या टीम इंडियाकडे नाही. त्याच्याऐवजी फलंदाजी-यष्टीरक्षण अशी समान गुणवत्ता असलेल्या ईशान किशनला संधी द्यायची की अस्सल यष्टीरक्षक हवा, असे म्हणत के. एस. भरतवर अवलंबून राहायचे याबाबतही टीम इंडियाकडून अचूक निर्णय अपेक्षित आहे.
– याशिवाय शमी, सिराजसह वेगवान गोलंदाजीचा तिसरा पर्याय म्हणून अनुभवी उमेश यादवला संधी द्यायची, की अष्टपैलू शार्दूल ठाकूरची निवड करायची हा निर्णयदेखील निर्णायक ठरू शकतो.
जागतिक कसोटी फायनल
भारत वि. ऑस्ट्रेलिया
वेळ : दुपारी ३ पासून
ठिकाण : दी ओव्हल, लंडन
प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स
नाणेफेकीचा कौल : नाणेफेक जिंकणारा संघ इथे प्रथम फलंदाजीचा निर्णय घेताना दिसतो; कारण प्रथम फलंदाजी करून कसोटी जिंकण्याची टक्केवारी येथे ३५ टक्के आहे, तर दुसऱ्या डावात फलंदाजी करून जिंकणाऱ्या संघाच्या यशाची टक्केवारी २७.८८ आहे. कसोटीच्या अखेरच्या काही दिवसांत फिरकी गोलंदाज प्रभावी ठरू शकतात. अन् प्रतिस्पर्धी संघांकडे तसे आव्हानात्मक फिरकी गोलंदाज आहेत.
खेळपट्टीचा अंदाज : ‘दी ओव्हल’ची खेळपट्टी ठणठणीत असून, इथे चेंडूला छान उसळीही मिळते. यामुळे कसोटीच्या सुरुवातीच्या दिवसांत फलंदाजांना व्यवस्थित फटकेबाजी करता येते.
हवामानाचा अंदाज : कसोटीच्या पूर्ण कालावधीत तापमान ढगाळ राहील; तसेच कमीतकमी तापमान २० अंश असेल.