म.टा. प्रतिनिधी, नागपूर : मृग नक्षत्र आणि मॉन्सून हे जुने समीकरण आता बदलले आहे. प्रादेशिक हवामान विभागानेसुद्धा हे मान्य केले आहे. हवामान विभागानुसार साधारणत: १५ जूनच्या आसपास विदर्भात मॉन्सूनचे आगमन होते. यंदा तर अद्याप केरळमध्येच मॉन्सून दाखल व्हायचा आहे. त्यामुळे तो विदर्भातही दाखल होण्यास उशीर असल्याचे हवामान खात्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

गेल्या काही वर्षांत हवामानात बरेच बदल झाले आहेत. मुख्यत्वे २१व्या शतकाच्या सुरुवातीपासूनच या बदलांची तीव्रता जा‌णवू लागली आहे. यात मान्सूनचे आगमन, त्याचा एकूण प्रवास आणि परतीचा प्रवास यातही बदल झाले आहेत. पावसाचे दिवसही कमी झाले असून एकाच दिवशी अधिक पर्जन्यमान होणे वा अतिवृष्टीच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या १२ वर्षांचा अभ्यास केला असता विदर्भातील मान्सून आगमनाची तारीख सातत्याने बदलत राहिली आहे. यात ११ वेळा मृग नक्षत्राला मान्सून आमगनाने हुलकावणी दिली आहे. यंदाही मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवशी मान्सून धारा बसरणार नाहीत.

विदर्भात २० जूननंतर?

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तेथे वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच झाल्यास केरळातील मॉन्सूनचे आगमन अधिक उशिराने होऊ शकते. त्यामुळे विदर्भातही मॉन्सून दाखल होण्यास उशीर होईल. केरळमध्ये साधारणत: १ जूनदरम्यान मॉन्सूनचे आगमन होते. त्यानंतर १५ जूनच्या आसपास तो विदर्भात दाखल होतो. मात्र, यंदा ८ ते १० जूनच्या दरम्यान मॉन्सून केरळात दाखल होऊ शकतो. तसे झाल्यास विदर्भात २० ते २३ जूनच्या आसपास मॉन्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे.
Biporjoy : अरबी समुद्रात ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ, मान्सूनचं काय होणार? हवामान विभागाने दिली अपडेट

उष्णतेची लाट?

यंदा एप्रिल व मे महिन्यातील उष्णतेच्या लाटांचे प्रमाण कमी होते. मात्र, मॉन्सूनला उशीर होत असून तापमान वाढू लागले आहे. मंगळवारी ब्रह्मपुरी येथे राज्यातील सर्वाधिक ४३.८ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार ८ ते १४ जून या काळातसुद्धा पारा वाढणार असून विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहू शकते.

अजित पवारांचे शिंदे सरकारच्या जाहिरातबाजीवर ताशेरे; शासन आपल्या दारीवरुन सुनावलं, सेनेच्या खासदारालाही झापलं

१२ वर्षातील जून महिन्यातील मान्सूनची आगमनाची तारीख

२०१० : १४ जून

२०११ : १५ जून

२०१२ : १७ जून

२०१३ : ९ जून

२०१४ : १९ जून

२०१५ : १३ जून

२०१६ : १८ जून

२०१७ : १६ जून

२०१८ : ८ जून

२०१९ : २२ जून

२०२० : १२ जून

२०२१ : ९ जून

२०२२ : १६ जून

ठाण्यात शिवसेना-भाजपमध्ये प्रचंड धुसफूस; बॅनरवरुन फडणवीसांचा फोटो हटवला, रविंद्र चव्हाणांशी वितुष्ट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here