राज्यातील बदल्यांची चौकशी करावी अशी मागणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर मंत्री मुश्रीफ यांनी त्यांच्यावर टीका करताना ‘सौ चुहे खाके…’ असा आरोप केला होता. त्याला पाटील यांनी बुधवारी उत्तर दिले व मुश्रीफांची निष्ठा दाखवण्यासाठी धडपड सुरू असल्याचे सांगितले.
वाचा:
आमदार पाटील म्हणाले, महाराष्ट्रात काही घडले की, मुख्यमंत्री काही बोलत नाहीत. खासदार संजय राऊतच काय तर उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील कधीच काही बोलत नाहीत. गेल्या सहा महिन्यात मी अनेक विधाने केली की लगेच मुश्रीफ मात्र रोज उठून माझ्याविषयी बोलत असतात. त्यांना निष्ठा दाखवायची मोठी घाई असते. पाच वर्षात आम्ही केलेल्या बदल्यांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. हे फारच हास्यास्पद आहे. पाच वर्षे हे काय झोपले होते का, असा सवाल करून ते म्हणाले, करोना संसर्गामुळे राज्यात बदल्या करणार नाही असे महाविकास आघाडीच्या सरकारने जाहीर केले होते. नंतर जुलैमध्ये बदल्या करण्यात आल्या. याचा अर्थ दोन महिन्यात करोना संसर्गाची परिस्थिती बदलली का? आस्थापना समितीच्या शिफारशींबाहेर मी बदल्या करणार नाही अशी भूमिका पोलिस महासंचालकांनी घेतली, मग महसूल आणि इतर खात्यात बदल्या कशा झाल्या. त्यामुळे बदल्यांची चौकशी करायची असेल तर प्रथम २०२० सालातील बदल्यांची करा, ही आमची मागणी आहे.
वाचा:
ग्रामपंचायतीवर झालेली प्रशासक नियुक्ती, पीएम केअर घोटाळा अशा अनेक प्रकरणात न्यायालयाने सरकारला चपराक दिली. तरीही मुश्रीफ बोलत राहतात. त्यांना रोज उठून न्यायालयाकडून थपडा खायच्या असतील तर कोण काय करणार, असा सवाल करून आमदार पाटील म्हणाले, करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात प्रशासन हतबल आहे. करोना साहित्य आणि औषध खरेदीत भ्रष्टाचार सुरू आहे, रुग्णांना बेड मिळत नाहीत, स्वॅबच्या अहवालात गोंधळ होत आहे. याबाबतच्या बातम्या रोज येत असताना मुश्रीफ त्या विषयीही काही बोलत नाहीत. जनतेचे लक्ष विचलीत करण्याची त्यांची धडपड सुरू आहे. त्यांचे बोलणे म्हणजे ‘गिरे तो भी….’ असाच प्रकार आहे, असा टोलाही त्यांनी मारला.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times