दोन मुलांचे मृतदेह लाकडी खोक्यात सापडल्याची घटना परिसरात वाऱ्यासारखी पसरली. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला. आठ वर्षांचा नीरज आणि सहा वर्षांची आरती परिसरात खेळत होते. खेळता खेळता दोघे लाकडी खोक्यात अडकले. नीरज आणि आरती दिसत नसल्यानं कुटुंबियांनी त्यांचा शोध सुरू केला. बेपत्ता झाल्याच्या चार तासांनंतर दोघांचे मृतदेह सापडले. श्वास गुदमरल्यानं दोघांचा मृत्यू झाल्याचं गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
मुलांचा शोध न लागल्यानं मंगळवारी संध्याकाळी सातच्या सुमारास पालकांनी पोलीस कंट्रोल रुमला फोन लावला. आरती आणि नीरजचे वडील बलबीर सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. पत्नी आणि पाच मुलं असा त्यांचा परिवार आहे. दोन मुलांच्या अकाली निधनानं त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
‘आम्ही परिसरात चौकशी केली. दुपारी तीनच्या सुमारास दोन्ही मुलं दिसली होती. जेवल्यानंतर ती खेळायला बाहेर पडली. त्यानंतर ती बेपत्ता झाली. दुपारी साडेतीन-चारच्या दरम्यान पालकांनी त्यांचा शोध सुरू केला. संध्याकाळी सातच्या दरम्यान त्यांनी गोदामात असलेला लाकडी खोका उघडला. त्यात मुलांचे मृतदेह आढळन आले,’ अशी माहिती आग्नेय दिल्लीचे पोलीस उपायुक्त राजेश देव यांनी दिली.
पोलिसांनी दोन्ही मुलांचे मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून ऑटोप्सी अहवाल आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल. ‘गुन्हे शाखेनं दोन्ही मुलांच्या मृतदेहाचं नीट निरीक्षण केलं. मृतदेहांवर कोणतीही जखम आढळलेली नाही. श्वास गुदमरुन दोघांचा मृत्यू झाला असावा,’ असं देव यांनी सांगितलं.