एनडीआरएफच्या जवानांनी अहोरात्र कष्ट करून बचावकार्य राबवले होते. या जवानांनी उन्हातान्हात उभं राहून, रात्रीची झोप न घेता तब्बल ७२ तास अथक काम केले. ढिगाऱ्यांखालून आणि चेंदामेंदा झालेल्या रेल्वेच्या डब्ब्यांमधून जिवंत प्रवाशांना बाहेर काढणे आणि छिन्नविछिन्न झालेले मृतदेह बाहेर काढून रुग्णवाहिकेपर्यंत नेण्याचे काम सतत सुरु होते. सतत या सगळ्या वातावरणात राहिल्यामुळे एनडीआरएफच्या पथकातील जवानांना मानसिक धक्का बसल्याची माहिती समोर येत आहे.
एनडीआरएफचे महासंचालक अतुल करवाल यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत बचाव पथकातील जवानांविषयी माहिती दिली. ओडिशा येथील रेस्क्यू ऑपरेशन संपल्यानंतर एनडीआरएफच्या जवानांना भ्रम होत आहेत. या जवानांना बचावकार्य राबवताना सतत जखमी लोक आणि विद्रुप झालेले मृतदेह हाताळावे लागत होते. या जवानांनी अपघातस्थळावरुन १२१ मृतदेह बाहेर काढले होते. यापैकी अनेक मृतदेहांचे हातपाय धडावेगळे झाले होते, काहींचे चेहरे विद्रूप झाले होते. तर ओव्हरहेड वायरचा शॉक लागलेल्या प्रवाशांच्या मृतदेहांचा अक्षरश: कोळसा झाला होता. हे एकूणच दृश्य अत्यंत भयावह होते. त्यामुळे आता बचावकार्य संपल्यानंतर एनडीआरएफच्या काही जवानांना भास होऊ लागले आहेत. एका जवानाला आता पाणी पाहिले की रक्त बघितल्याचा भास होत आहे. तर आणखी एका एनडीआरएफच्या जवानाची अन्नावरची वासना पूर्णपणे उडाली आहे. मानसिक धक्का बसल्यामुळे या जवानांना अशाप्रकारचे भ्रम आणि त्रास जाणवत आहेत. डॉक्टरांकडून तातडीने या जवानांचे मानसिक समूपदेशन सुरु करण्यात आल्याची माहिती एनडीआरएफच्या महासंचालकांनी दिली.