पुणे : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यामध्ये काँग्रेसही मागे नसून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत नुकताच राज्यभरातील लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. मात्र या आढावा बैठकीतील एक व्हिडिओ सध्या समोर आला असून यामध्ये पुण्यातील काँग्रेस नेते आणि माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांबाबत स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. राज्य पातळीवरील नेते पुण्यात आल्यानंतर पक्षविरोधी काम करणाऱ्या नेत्यांना सोबत घेऊन बसतात, असा हल्लाबोल बागवे यांनी केला आहे.

‘नगरसेवक होण्यासाठी १० वर्ष काम करावं लागतं, २५ वर्ष काम केल्यानंतर आमदारकीचा उमेदवार होतो. मात्र आपले नेते पुण्यात आल्यानंतर निवडणुकांत पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्या नेत्यांच्या घरी जातात,’ असं म्हणत रमेश बागवे यांनी आपली नाराजी व्यक्त केली. लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसने मुंबईत बैठक घेतली. या बैठकीत बागवे यांनी आपली खदखद बोलून दाखवली आहे.

नाना पटोलेंनी केक कपला, पहिला तुकडा पत्नीला भरवला

कोल्हापुरात स्थिती चिघळली; आक्रमक आंदोलकांवर पोलिसांचा लाठीमार, औरंगजेबावरील पोस्टमुळे वादंग

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष उफाळून आला असून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी विविध नेते दिल्लीवारी करत आहेत. अशातच आता स्थानिक नेतेही पक्षाच्या बैठकीत आक्रमकपणे नाराजी व्यक्त करू लागल्याने पटोले यांच्यासमोरील आव्हान आणखी गंभीर झाले आहे.

कोणत्या मतदारसंघांचा काँग्रेसने घेतला आढावा?

मागील आठवड्यात महाराष्ट्र काँग्रेसतर्फे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, रावेर, अहमदनगर, शिर्डी, नाशिक, दिंडोरी, लातूर, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ वाशिम, गडचिरोली चिमूर, भंडारा गोदिया, वर्धा, नागपूर, रामटेक व पालघर या मतदारसंघाचा शुक्रवारी आढावा घेण्यात आला. उर्वरित मतदारसंघाचा आढावा शनिवारी घेतला गेला. या बैठकीत विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषद गटनेते सतेज पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष आरिफ नसीम खान आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here