म. टा. प्रतिनिधी, सांगलीः माहिती अधिकारात माहिती मागून भ्रष्टाराची तक्रार दाखल करण्याची भीती दाखवत इस्लामपूर येथील कृषी अधिकाऱ्यांना आठ लाखांच्या खंडणीसाठी धमकावणाऱ्या दोघांना खंडणीविरोधी पथकाने अटक केली. सुयोग गजानन औंधकर (वय ३३, का. कासेगाव, ता. वाळवा) आणि कृष्णा विश्वनाथ जंगम (वय ६०, रा. वाळवा, ता. वाळवा) अशी अटकेतील दोघा सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. या दोघांवर यापूर्वी इस्लामपूर आणि आष्टा पोलिस ठाण्यात खंडणीचे गुन्हे दाखल आहेत.

पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगली जिल्ह्यात बांधकाम व्यवसायिक, डॉक्टर, व्यापारी, सरकारी अधिकारी यांच्याकडून खंडणी उकळणाऱ्या टोळ्यांनी दहशत माजवण्याचा तक्रारी वाढल्या आहेत. खंडणीखोरांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी तक्रारदारांनी निर्भीडपणे पुढे यावे, असे आवाहन पोलिसांनी केले होते. यानुसार इस्लामपूर येथील कृषी विभागात कार्यरत असलेले तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक मुकुंद हनुमंत जाधव (रा. विजयनगर, सांगली) यांनी खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार केली. कासेगाव येथील सुयोग औंधकर आणि वाळव्यातील कृष्णा जंगम या दोघांनी जाधव यांच्याकडे माहिती अधिकारात कार्यालयीन कामकाजाची माहिती मागितली होती. यानंतर जाधवर यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या कृषी कंपनीची माहिती मागवून त्यांना त्रास देणे सुरू केले. भ्रष्टाचार केल्याचा आरोप करून त्यांनी प्रकरण मिटवण्यासाठी आठ लाख रुपयांच्या खंडणीसाठी मागणी केली. याशिवाय दर महिन्याला २० हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले.

या त्रासाला कंटाळून जाधवर यांनी खंडणी विरोधी पथकाकडे धाव घेतली. पोलिसांनी बुधवारी दोन्ही संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी खंडणीसाठी जाधवर यांना त्रास दिल्याचे स्पष्ट झाले. यानंतर खंडणीविरोधी पथकाने औंधकर आणि जंगम या दोघांना अटक केली. औंधकर याच्याविरोधात यापूर्वी इस्लामपूर पोलिस ठाण्यात खंडणीचे तीन गुन्हे दाखल आहेत, तर जंगम याच्या विरोधात इस्लामपूर पोलिस ठाण्यात खंडणीचे तीन आणि आष्टा पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. पोलिसांच्या रेकॉर्डवरील या सराईत गुन्हेगारांनी आणखी काही लोकांकडून खंडणी उकळल्याचा पोलिसांना संशय आहे. याबाबत नागरिकांनी तक्रारी द्याव्यात, असे आवाहन पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी केले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here