मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीच्या मिरजेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक योगेंद्र थोरात यांना सांगली महापालिकेतील एका अधिकाऱ्याकडून थेट कोंबड्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर नगरसेवक थोरात यांनी थेट कोंबडा घेऊन महापालिकेच्या दारात आंदोलन केले आहे. नुकतेच महापालिकेच्या महासभेमध्ये नगरसेवकांना वॉर्डातील विकास कामांसाठी तीस लाखांचा निधी देण्याचे मंजूर करण्यात आले आहे. त्यानुसार राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी आपल्या वॉर्डातील विकास कामांची फाईल महापालिकेच्या संबंधित विभागातल्या अधिकाऱ्यांकडे दिली होती.
मात्र त्या अधिकाऱ्याने नगरसेवक थोरात यांना निधी नाही, फाईलसोबत आयुक्तांचा कोंबडा आणा, असं सुनावलं. यात आयुक्तांचा कोंबडा म्हणजे आयुक्तांची सही आणा असे त्यांना सांगायचे होते. यानंतर संतप्त झालेल्या थोरात यांनी पालिका अधिकाऱ्याच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त करत थेट महापालिकेसमोर आंदोलन केले आहे. अधिकाऱ्याने मागितलेल्या कोंबड्यानुसार थेट जिवंत कोंबडा घेऊन संबंधित अधिकाऱ्याला फाईलबरोबर कोंबडा देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर महापालिकेच्या दारात फाईल आणि कोंबडा घेऊन थोरात यांनी ठिय्या आंदोलन केले. दरम्यान थोरात यांच्या या अनोख्या आंदोलनामुळे महापालिकेच्या वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती.