तिच्या शीटवर चहा सांडल्यानंतर ती घाबरली, तिला तिचं स्वप्न तिच्यापासून दूर होताना दिसू लागलं. डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. डोळ्यात पाणी घेऊन तिने पर्यवेक्षकाकडे उत्तरं पुन्हा भरण्यासाठी फक्त ५ मिनिटांचा कालावधी मागितला. पण, तिला तो देण्यात आला नाही. आता या विद्यार्थिनीने याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. बस्सी शहरातील रहिवासी असलेल्या १८ वर्षीय दिशा शर्माला न्यायालयाकडून न्याय मिळेल आणि डॉक्टर होण्याचे तिचे स्वप्न पूर्ण होईल, अशी आशा आहे.
दिशाच्या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने एनटीएकडून विद्यार्थिनीच्या मूळ ओएमआर शीटसह संपूर्ण रेकॉर्ड मागवला आहे. त्याचवेळी ४ जुलै रोजी शाळेच्या मुख्याध्यापकांना परीक्षा केंद्रावरील वर्गातील सीसीटीव्ही फुटेजसह न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
१२ वीच्या परीक्षेत दिशाने ९९.६० टक्के गुण मिळवले होते. डॉक्टर होण्यासाठी ती ७ मे रोजी रामनगरिया येथील विवेक टेक्नो स्कूलमध्ये NEET परीक्षा देत होती. यावेळी पर्यवेक्षक चहा घेत परीक्षा खोलीत फिरत होते. तेवढ्याच त्यांच्या हातातून चहा सांडला आणि तो थेट दिशाच्या ओएमआर शीटवर जाऊन पडला.
चहा सांडल्यामुळे दिशाच्या १७ प्रश्नांची उत्तरे पूर्णपणे मिटल्याचा आरोप तिने केला आहे. ती रडत होती, विनवणी करत होती, पण कुणीही तिचं काहीही ऐकलं नाही. या घटनेनंतर पर्यवेक्षकही गायब झाला आहे. यानंतर दिशाने याप्रकरणी मुख्याध्यापकांकडे दाद मागितली. पण, तिला तिथेही न्याय मिळाला नाही.
सीसीटीव्ही फुटेजही तपासले, काहीही फायदा झाला नाही
या घटनेनंतर दिशाने परीक्षा केंद्रावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले आणि संपूर्ण घटनेची माहितीही दिली. तरीही त्याची सुनावणी झाली नाही. प्रश्नांची उत्तरं लिहिण्यासाठी त्यांनी आणखी पाच मिनिटे वेळ मागितला होता, पण तोही तिला देण्यात आला नाही. आता दिशाला आशा आहे की न्यायालयाच्या हस्तक्षेपाने तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल.