संसदेच्या स्थायी समितीच्या सदस्यांना आयसीएमआरचे महासंचालक बलाराम भार्गव यांनी माहिती दिली. भारत बायोटेक, कॅडिला आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने विकसित करत असलेल्या लशी वेगवेगळ्या टप्प्यात आहेत. ही माहिती बैठकीला उपस्थित असलेल्या एका खासदाराने दिली.
भारत बायोटेक आणि कॅडिला यांनी तयार केलेल्या लशींची दुसऱ्या टप्प्यातील चाचणी पूर्ण होण्यात आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या मदतीने, सीरम इन्स्टिट्यूट तयार करत असलेली लस गेल्या आठवड्याच्या शेवटी चाचणी दुसऱ्या टप्प्यात 2 (बी) मध्ये दाखल झाली आहे. यासाठी देशभरातील १७ केंद्रांवर १७०० रूग्णांची ओळख पटली आहे.
करोना व्हायरसा आणखी किती काळ नागरिकांना सामना करावा लागेल? असा प्रश्न बैठकीत उपस्थि असलेल्या खासदारांनी केला. अंतिम टप्प्यातील चाचणीसाठी सहसा ६ ते ९ महिने लागतात. पण सरकारने निर्णय घेतल्यास आपत्कालीन अधिकृततेचा विचार केला जाऊ शकतो, असं उत्तर भार्गव यांनी दिलं. लस तयार करण्यासाठी साधारणत: १ वर्षापेक्षा जास्त कालावधी लागतो. पण साथीची सद्यस्थिती पाहता सर्व देशांमध्ये क्लिनिकल चाचण्यांचा कालावधी कमी ठेवला जात आहे.
आयसीएमआर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कोरोना व्हायरसविरोधातील भूमिकेचे संसदीय समितीच्या सर्व सदस्यांनी कौतुक केले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times