शहरी भागातील करोनाचा संसर्ग नियंत्रणात येत असला तरीही ग्रामीण भागामध्ये तो आटोक्यात आलेला नाही. मात्र लक्षण नसलेल्या, सौम्य लक्षणे असलेल्या तसेच बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९६ टक्के इतके आहे. हे प्रमाण दिलासादायक असल्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने केलेल्या सर्वेक्षणामध्ये दिसून आले आहे.
गंभीर रुग्णांची संख्या ४३६७ असून, हे प्रमाण ३ टक्के असून, आयसीयूबाहेर पण ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांचे प्रमाण १ टक्का आहे. राज्यातील १ लाख ४८ हजार ८०५ रुग्ण हे लक्षण नसलेले, सौम्य लक्षणांसह बरे होण्याच्या मार्गावर असलेले आहेत. त्यामुळे करोना संसर्ग झाला, तरी तो नियंत्रणात येऊ शकतो, हा दिलासा मिळाला आहे. अतिदक्षता विभागातून बाहेर आलेल्या रुग्णांची संख्या राज्यात २०८९ इतकी आहे. मागील काही दिवसांमध्ये सौम्य लक्षणे असलेल्या वा पॉझिटिव्ह असूनही कोणत्याही प्रकारची लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. हे रुग्ण संसर्ग पसरवण्यासाठी सक्रिय असतात का, यासंदर्भातही मतांतरे आहेत. त्यांच्या घरी संबंधित सुविधा असल्यास निवासस्थानीच विलग राहण्याचा सल्ला देण्यात येतो.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times