म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : भाजप खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर दाखल केलेल्या महिला कुस्तीगीरांच्या लैंगिक छळाच्या गुन्ह्याप्रकरणी पोलिस १५ जूनपर्यंत आरोपपत्र दाखल करणार आहेत. तोपर्यंत वेळ द्यावा, अशी विनंती बुधवारी सरकारने आंदोलक कुस्तीगीरांना केली. ती मान्य करीत कुस्तीगीरांनी आपले आंदोलन १५ जूनपर्यंत स्थगित केले.ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक आदी आंदोलक कुस्तीगीर आणि भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी बुधवारी क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्यासोबत मॅरेथॉन चर्चा केली. यावेळी सरकारकडून आंदोलक कुस्तीगीरांना वरील आश्वासन देण्यात आले. त्याचप्रमाणे आरोपपत्र दाखल झाल्यानंतर ३० जूनपर्यंत कुस्ती महासंघाची निवडणूक घेतली जाईल, तसेच महासंघाची अंतर्गत तक्रार समिती स्थापन केली जाईल. त्याचे नेतृत्व एका महिलेकडे असेल, या कुस्तीगीरांच्या मागण्याही मान्य करण्यात आल्याचे अनुराग ठाकूर यांनी पत्रकारांना सांगितले.

या कुस्तीगीरांनी शनिवारी रात्री गृहमंत्री अमित शहा यांच्याशी केलेल्या चर्चा केल्यानंतर क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी कुस्तीगीरांना चर्चेसाठी बोलावले होते. त्यानुसार, बुधवारी कुस्तीगीरांची बुधवारी क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्यासोबत चर्चा झाली. दरम्यान, सोमवारपासून पुनीया, मलिक आणि विनेश फोगट रेल्वेतील नोकरीवर रुजू झाले असले, तरी आंदोलन मागे घेतले नाही, हे त्यांनी स्पष्ट केले होते.

तब्बल सहा तासांहून अधिक काळ चाललेल्या या बैठकीनंतर पुनिया म्हणाला की, सरकारच्या आश्वासनावर विश्वास ठेवून आम्ही १५ जूनपर्यंत आंदोलन करणार नाही. सरकारने आमच्याकडे एका आठवड्याचा वेळ मागितला आहे. या महिन्याच्या १५ तारखेपर्यंत दिल्ली पोलिस तपास पूर्ण करतील, असे आश्वासन देण्यात आले आहे. बृजभूषण सिंह यांच्या अटकेची कारवाई ही दिल्ली पोलिसांच्या तपासावर अवलंबून आहे. खाप आणि इतर खेळाडूंसोबतच्या बैठकीत आम्ही जो निर्णय घेऊ त्याप्रमाणे आंदोलनाची पुढील दिशा निश्चित होईल जाईल, असे सांगून पुनिया म्हणाला की, आम्हाला सरकारकडून सांगण्यात आले आहे की, बृजभूषण यांना कुस्ती महासंघामधून बाहेर काढले जाईल व निवडणुकीत आमचा सल्ला घेतला जाईल, असे आश्वासनही सरकारने दिले आहे. त्याचवेळी आम्ही आमच्या मागण्यांपासून तसूभरही मागे हटलो नसल्याचाही पुरुच्चार पुनियाने केला. बैठकीत काय झाले ते आम्ही सर्वांना सांगितले आहे, असेही त्याने सांगितले.

‘आमची मागणी हीच आहे की, महिला असो वा पुरुष, चांगल्या लोकांनाच कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बनवायला हवे. आमची सरकारकडे हीच मागणी आहे, जी आम्ही आजच्याही बैठकीत मांडली. २८ मे रोजी आंदोलन मोडून काढताना दिल्ली पोलिसांनी कुस्तीगीरांवर दाखल केलेले गुन्हेदेखील मागे घेण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे,’ असे पुनियाने सांगितले.

विनेश फोगट आजच्या बैठकीला आली नव्हती. मात्र ती नाराज नाही असे सांगून पुनिया म्हणाला की, तिची प्रकृती ठीक नाही व मध्यंतरी घडलेल्या घटनांमुळे ती थोडी घाबरलेली आहे. या मुद्द्यावर मुलींना अधिक त्रास सहन करावा लागला आहे.
Wrestler Protest: न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहणार, अफवांवर विश्वास ठेवू नका, कुस्तीपटूंचं आवाहन
… तर पुन्हा आंदोलन

क्रीडामंत्र्यांबरोबर आमचा संवाद चांगला झाला. आम्ही काहीही लपवून ठेवणार नाही, जे होईल ते आम्ही सर्वांना सांगू. १५ जूनपर्यंत सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर पुन्हा आंदोलन करू, असाही इशारा पुनियाने दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here