या सगळ्या प्रकरणाचा तपास करत असताना आता एक-एक करुन हत्याप्रकरणाचा घटनाक्रम आणि इतर तपशील समोर येण्यास सुरुवात झाली आहे. पोलिसांच्या अंदाजानुसार मनोजने रविवारी सरस्वती वैद्य यांची हत्या केली असावी. मनोजने गळा दाबून त्यांना ठार मारले असावे. त्यानंतर करवतीच्या साहाय्याने मनोजने सरस्वती यांच्या मृतदेहाचे तुकडे केले. मनोज मृतदेहाचे तुकडे करून आरोपी ते तुकडे प्रेशर कुकरमध्ये टाकायचा, ते उकळायचा आणि मग मिक्सरमध्ये बारीक करायचा. हे तुकडे तो पिशवीत भरून इमारतीच्या मागे असलेल्या गटारात फेकून द्यायचा. यासाठी तो त्याच्या बाईकचा वापर करायचा. पोलिसांनी मनोजने गुन्ह्यासाठी वापरलेली हत्यारं आणि बाईक ताब्यात घेतली आहे.
या प्रकरणाची चौकशी करताना नागरिकांनी पोलिसांना एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. गेल्या दोन-तीन दिवसांपासून मनोज आजुबाजूच्या परिसरातील कुत्र्यांना अचानक खायला घालू लागला होता. यापूर्वी मनोज सहानीने कुत्र्यांना कधीही खायला घातले नव्हते. त्यामुळे मनोज कुत्र्यांना खाऊ घालत असलेल्या पदार्थांमध्ये सरस्वती वैद्य यांच्या मृतदेहाचे बारीक केलेले तुकडे असावेत, असा पोलिसांनी संशय आहे. पोलिसांनी आता मनोजने सरस्वती वैद्य यांच्या मृतदेहाचे तुकडे कुठे-कुठे टाकले आहेत, याचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. अद्याप पोलिसांना सरस्वती वैद्य यांचे शिर मिळालेले नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टी शोधण्याचे आव्हान सध्या पोलिसांसमोर आहे.