‘ठोस निर्णय नाही’
पवार म्हणाले, ‘केंद्र व राज्य सरकार लोकांचे प्रश्न सोडविण्यात उदासीन आहे. शेतकरी अडचणीत आहे. कापूस, सोयाबीन उत्पादकांचा प्रश्न गंभीर आहे. मात्र, त्यावर तोडगा काढला गेला नाही. समाजातील सर्व घटकांना संरक्षण देणे आवश्यक आहे. दोषींना शिक्षा देण्याची जबाबदारी सरकारची आहे. त्यात कुठेही ठोस निर्णय घेतल्याचे दिसत नाही. शेतीविषयी केलेल्या घोषणा कृतीत याव्यात; तसेच व्यवहार्य असाव्यात.
‘विरोधकांची एकजूट व्हावी’
‘लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रित होतील, अशी चर्चा असली, तरीही केंद्र सरकार या निवडणुका एकत्रित घेईल, अशी शक्यता नाही. त्यांच्यात एकत्र निवडणुका घेण्याची धमक नाही. दक्षिणेत भाजप कुठेही नाही. मध्य प्रदेश, गोवा व महाराष्ट्रात त्यांची सत्ता कशी आली हे सर्वांना माहीत आहे. उत्तर प्रदेश, आसाममध्ये त्यांची सत्ता आहे. मात्र, देशातील बहुतांश राज्यात भाजपची सत्ता नाही. हा मुद्दाही आगामी काळात विचारात घेतला जाईल. विरोधकांची एकजूट व्हावी अशी आमची इच्छा आहे. त्या दृष्टीने लवकरच सर्वपक्षांची बैठक होणार आहे. नेता कोण असावा हा मुद्दा गौण आहे. आधी सर्वांनी एकत्र आले पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. एकत्र येऊन पर्याय देण्याची आवश्यकता आहे,’ असेही पवार म्हणाले.
सरकारचे दंगलीला प्रोत्साहन
‘राज्यात दंगली घडविल्या जात आहेत. घटना कोल्हापुरात घडते आणि त्याचे पडसाद पुण्यात उमटतात. यावरून सरकारच दंगलीला प्रोत्साहन देत असल्याचे दिसते,’ असा गंभीर आरोप पवार यांनी केला. ‘माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची परंपरा महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल रमेश बैस राबवित आहेत काय,’ असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला असता ते म्हणाले, ‘पेशवाईबद्दल आस्था असलेली मंडळी सत्तेत आहेत. तीच विचारसरणी घेऊन ही मंडळी पुढे जात आहेत. कुलगुरुंच्या नियुक्त्यांची नावे पाहा,’ असे पवार म्हणाले.
‘भारत राष्ट्र समिती महाराष्ट्रात पाय रोवू पाहत आहे,’ यावर विचारले असता पवार म्हणाले, ‘त्यांना दुर्लक्षून चालणार नाही. मात्र, चिंता करण्याची आवश्यकता वाटत नाही. त्यांनी तेलंगणमध्ये विविध घटकांना वाटप सुरू केले आहे. त्याचा नेमका परिणाम काय झाला आहे, राज्यात किती विकास झाला आहे, हेही पाहिले पाहिजे. पाणी, रस्ते, वीज, आरोग्य सुविधा, शैक्षणिक सुविधा यावर अधिक भर दिला पाहिजे. याऐवजी वाटप हे सूत्र ठेवले, तर यातून समाधान मिळत नाही.’
‘गडकरींचे काम उल्लेखनीय’
नऊ वर्षांत केंद्र सरकारमधील कोणत्या मंत्र्यांचे काम अधिक चांगले वाटले असा विचारले असता पवार म्हणाले, ‘नितीन गडकरी यांचे काम चांगले आहे. पक्षीय दृष्टिकोन ठेवून ते निर्णय घेत नाहीत. विकासाच्या कामात त्यांना रस आहे. शेवटी सरकार तुमच्या हाती आल्यानंतर सरकारला काही तरी रिझल्ट द्यावा लागतो. त्यात गडकरी पुढे आहेत.’
‘नंबर वाढविण्यासाठी जागा मागू नये’
लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात महाविकास आघाडीत सुरू झालेल्या बैठकांबद्दल पवार म्हणाले, ‘तीनही पक्षांच्या दोन दोन प्रतिनिधींची जागावाटपावर बैठकीची प्रक्रिया सुरू होईल. प्रत्येक पक्ष अधिक जागांची मागणी करेल; मात्र ज्यांची निवडून आणण्याची क्षमता आहे, त्यांचा निश्चितच विचार होईल. नंबर वाढविण्यासाठी जागा मागू नये, अशी आमची भूमिका आहे.’