नया नगर पोलिसांनी मनोजचं घर गाठलं. त्यांनी दार ठोठावलं. दार उघडताच उग्र दुर्गंधी आली. पोलिसांनी घराची झडती सुरू केली. तेव्हा त्यांना महिलेच्या मृतदेहाचे तुकडे सापडले. हा प्रकार पाहून पोलिसांना धक्काच बसला. त्यांनी मनोजला अटक केली. त्याची चौकशी करण्यात आली. लिव्ह इन पार्टनरची हत्या केल्याची कबुली त्यानं दिली.
मनोज आणि सरस्वतीचा काही कारणांवरुन वाद झाला. मनोजनं संतापाच्या भरात सरस्वतीची हत्या केली. त्यानंतर मनोज बाजारात गेला आणि करवत घेऊन आला. त्यानं फ्लॅटमध्ये येऊन मृतदेहाचे अनेक तुकडे केले. ते तुकडे त्यानं प्रेशर कूकरमध्ये टाकून उकळले. पुरावे मिटवण्यासाठी आणि दुर्गंधी टाळण्यासाठी त्यानं हा प्रकार केला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे.
महिलेची हत्या ३ ते ४ दिवसांपूर्वी झाली असावी असं पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर सांगितलं. पोलिसांनी मृतदेहाचे तुकडे गोळा करुन शवविच्छेदनासाठी पाठवले. फॉरेन्सिकचं पथक घटनास्थळी पोहोचलं आहे. फ्लॅटमधील अन्य पुरावेदेखील गोळा करण्यात आले आहेत. शवविच्छेदन अहवालातून अधिक माहिती उघडकीस येईल, असं पोलिसांनी सांगितलं. आरोपीची चौकशी सुरू असून फ्लॅट सील करण्यात आला आहे.