सोलापूर : करमाळा शहराजवळ सोलापूर-अहमदनगर रस्त्यावर उभ्या असलेल्या स्विफ्ट कारमध्ये अर्धवट जळालेल्या अवस्थेत बेवारस मृतदेह करमाळा पोलिसांना आढळून आला होता. सदर व्यक्तीचा खून झाल्याचा संशय पोलिसांना होता. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील करमाळा पोलिसांनी अवघ्या १६ तासांत गुन्ह्याचे धागेदोरे शोधून याप्रकरणी दोन सख्ख्या भावांना अटक केली आहे. आईबरोबर अनैतिक संबंध ठेवल्याच्या रागातून चिडून दोघा भावांनी तिच्या प्रियकराचा अन्य एका महिलेसह कट रचून हा खून केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी संशयित दोन्ही मुलांना ताब्यात घेतले असून कोर्टात हजर केले. श्रावण रघुनाथ चव्हाण (रा. अडसुरेगाव, ता.येवला, जि. नाशिक) असं मृत व्यक्तीचं नाव आहे तर सुनील शांताराम घाडगे (वय-२८) आणि राहुल शांताराम घाडगे (वय-३०, दोघे रा. अंदरसुल, ता. येवला जि नाशिक) अशी अटकेत असलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, करमाळा पोलिसांना ५ जून रोजी करमाळा-अहमदनगर रस्त्यावरील एमआयडीसी शेजारील आडरानात उभ्या असलेल्या स्विफ्ट कारमध्ये अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. पोलिसांनी आधी या मृतदेहाची ओळख पटवली. त्यामध्ये हा मृतदेह श्रावण रघुनाथ चव्हाण (रा. अडसुरेगाव, ता.येवला, जि. नाशिक) या व्यक्तीचा असल्याची खात्री केली. मयताचा भाऊ संभाजी रघुनाथ चव्हाण यांकडून अधिक माहिती घेतली असता धक्कादायक बाब समोर आली. अनैतिक संबंधांतून हा खून झाल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्याने करमाळा पोलीस स्टेशनमध्ये मयताचा भाऊ संभाजी रघुनाथ चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे.

Rahul Narvekar : लवकरच क्रांतिकारी निर्णय घेईन, राहुल नार्वेकरांचं वक्तव्य, गिरीश महाजनांचा थेट डोक्याला हात

‘दोन्ही मुलं आईच्या प्रियकरावर चिडून होते’

मयताचा भाऊ संभाजी चव्हाण याने फिर्यादीत म्हटलं आहे की, माझे भाऊ श्रवण चव्हाण याचे आरोपींच्या आईशी अनैतिक संबंध होते. याची चिड आरोपींना होती. त्यामुळे यातील संशयित आरोपी सुनील शांताराम घाडगे व राहुल शांताराम घाडगे यांनी माझ्या भावाला ३ जून रोजी अंदरसूल येथे सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास बोलावले होते. त्यानंतर या दोघांसह एका महिलेने भावाला जीवे ठार मारून त्याच्याच स्विफ्ट कारमध्ये मृतदेह टाकून गाडीसह जाळण्याचा प्रयत्न केला. ही स्विफ्ट कार क्रमांक एम. एच. १५ सी. टी. ८००६ करमाळा हद्दीत ५ जून रोजी आढळली.

अनेक प्रश्नांची उकल करणं बाकी!

करमाळा तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील व पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांनी तपासाबाबत नियोजन केले. पोलीस उपविभागीय अधिकारी अजित पाटील, करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक मिठू जगदाळे यांनी कौशल्याने तपास करून गुन्हा उजेडात आणला. या गुन्ह्यातील तिसऱ्या संशयित महिला आरोपीला अटक करायची आहे. खून कोणत्या हत्याराने झाला? केव्हा आणि कोठे केला? गुन्ह्यात आणखी कोणा कोणाचा सहभाग आहे का? मृतदेह आणि मोटार कशी पेटवली? मृतदेह मोटारीत टाकून कोणत्या मार्गाने आणला? याची उकल करावयाची आहे. तसंच मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजही तपासायचे आहेत. त्या अनुषंगाने पोलीस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here