मिरारोड: मिरारोडच्या गीतानगर परिसरात लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या एका महिलेची निर्घृणपणे हत्या झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मनोज साने आणि सरस्वती वैद्य हे दोघेजण गीता आकाशदीप कॉम्प्लेक्समधील जे विंगमध्ये ७०४ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये राहत होते. सहानी यांच्या फ्लॅटमधून अनेक दिवसांपासून दुर्गंधी येत होती. त्यामुळे बुधवारी रात्री या इमारतीमधील रहिवाशांनी नयानगर पोलिसांकडे याबाबत तक्रार केली. यानंतर पोलीस घटनास्थळी आले असता या हत्याप्रकरणाचा उलगडा झाला. मनोज साने याने सरस्वती वैद्य यांची हत्या केल्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे तुकडे केले. मृतदेहाच्या काही भागाची मनोजने विल्हेवाट लावली आहे. तर उर्वरित मृतदेहाचे तुकडे पोलिसांनी फ्लॅटमधून ताब्यात घेतले.

Crime: मिरारोडच्या फ्लॅटमध्ये पोलिसांनी पाऊल ठेवताच फक्त पाय दिसले, उर्वरित धड गायब, लिव्ह इनमधील महिलेची हत्या

पोलिसांनी चादर आणि निळ्या पिशव्यांमध्ये भरुन सरस्वती वैद्य यांच्या मृतदेहाचे तुकडे फॉरेन्सिक लॅबमध्ये नेले. यावेळी या इमारतीच्या खाली नागरिकांची एकच गर्दी झाली होती. कर्मचारी एक-एक करुन चादरी आणि पिशव्यांमधून मृतदेहाचे तुकडे आणून गाडीत ठेवत होते. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा उभे असलेले नागरिक हे सगळे दृश्य डोळे विस्फारुन पाहत होते. हा सगळा प्रकार सुरु असताना कुत्रे भेसूर आवाजात भुंकत होते. हे एकूणच दृश्य अंगावर काटा आणणारे होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या इमारतीमध्ये राहणाऱ्या मनोज साने यांनी त्यांच्यासोबत राहणाऱ्या सरस्वती वैद्य यांची तीन-चार दिवसांपूर्वी हत्या केली. त्यानंतर मनोजने लाकुड कापण्याची मशीन विकत आणली आणि मृतदेहाचे तुकडे केले. यानंतर मनोजने मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये शिजवून प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये भरले. पोलिसांनी घटनास्थळावरुन सरस्वती वैद्य यांच्या मृतदेहाचे १२ ते १३ तुकडे ताब्यात घेतले आहेत. सध्या पोलिसांकडून याप्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here