अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला असताना विविध पोलिस ठाण्यांकडून लागू करण्यात आलेल्या नियमांमुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस किंवा अग्निशमन दलाच्या परवानगीऐवजी थेट पालिका कार्यालयाकडून, गतवर्षीच्या परवानगीच्या आधारावर परवानगी देण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र साकीनाका, घाटकोपर यांसह विविध पोलिस ठाण्यांकडून मंडळांना स्वतंत्र हमीपत्रासह, परवानगीसाठी अर्ज करण्यास सांगितले जात असल्याचे मंडळांचे म्हणणे आहे. ही बाब समन्वय समितीने मंगळवारी पोलिस आयुक्तांच्या लक्षात आणून दिली असून, या विषयात लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्याचे समितीकडून कळते आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा सार्वजनिक गणेशोत्सवाच्या आयोजन प्रक्रियेत बरेच बदल झाले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने पालिकेसह राज्य सरकारकडून देखील कडक नियम जाहीर करण्यात आले आहेत. मात्र एकीकडे मंडळांना बाप्पाच्या आगमनाचे वेध लागले असताना, आता हमीपत्राच्या बंधनात अडकवण्यात येत असल्याचे दिसून येत आहेत. यावर्षी मंडप उभारणीची परवानगी थेट पालिकेच्या विभागीय कार्यालयाकडून दिली जाईल. अग्निशमन दल किंवा स्थानिक पोलिस ठाण्याकडून मिळणाऱ्या परवानगीची गरज नाही, असे परिपत्रकातून जाहीर केले होते. मात्र मागील आठवड्यापासून विविध पोलिस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांकडून विभागातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंडळांसोबत बैठका बोलवण्यात येत आहेत. मात्र या बैठकांमध्ये देणे, मंडप तसेच ध्वनिक्षेपकाबाबत अर्ज देण्याबाबत सूचना दिल्या जात आहेत. दोन दिवसांनी बाप्पा मंडपात विराजमान होण्यास सज्ज असताना पोलिसांच्या या नियमांमुळे मंडळांमध्ये मात्र गोंधळ पसरला आहे. पालिकेला हमीपत्र सादर केले आहे. मात्र पोलिसांना वेळेत हमीपत्र सादर न करता आल्यास कारवाई होणार का, ही भीती मंडळांमध्ये पसरली आहे. यामुळे पालिका आणि पोलिस प्रशासन यांच्यामध्ये समन्वय नसल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे.
करोनामुळे यंत्रणेवर ताण असल्याने यंत्रणा आणि मंडळांमध्ये स्थानिक स्तरावर समन्वय राहावा यासाठी समितीतर्फे कोविड कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. या दलाकडे विविध विभागांमधून तक्रारी येत आहेत. अनेक ठिकाणी योग्य चर्चा करून समेट घडवण्यात येत आहे. ‘काही पोलिस ठाण्यांकडून हमीपत्र मागण्यात येत असल्याची तक्रार कृती समितीकडे आली असून समन्वय समितीला त्याबाबत कळवण्यात आले आहे. विभागवार नियम बदलत असल्याने मंडळांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे मुंबई स्तरावर एकच नियमावली असणे गरजेचे आहे. एकीकडे पालिकेकडून योग्य सहकार्य मिळत असताना, पोलिसांकडून होणारी अडवणूक धक्कादायक आहे’, अशी प्रतिक्रिया कोविड कृती दल सदस्य ओंकार सावंत यांनी दिली. याबाबत संबंधित पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलो मात्र तो होऊ शकला नाही.
पोलिसांवरील सुरक्षेसंबंधित असलेला ताण आम्ही निश्चितच समजू शकतो. पोलिसांच्या विभागवार बदलणाऱ्या नियमांमुळे स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या गोंधळाबाबत आम्ही संयमी भूमिका घेतली होती. मात्र सण तोंडावर असताना हमीपत्राची मागणी करणे योग्य नाही. पोलिसांकडून सहकार्याची अपेक्षा आहे. ही बाब आयुक्तांना लक्षात आणून दिली आहे. काही ठिकाणी उत्सव न होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे.
– नरेश दहिबावकर, अध्यक्ष, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती
सुतक लागले आहे समजून उत्सव रद्द करा
धारावीतील पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने मंडळांनी उत्सव रद्द करावा यासाठी धक्कादायक सल्ला दिल्याचे कळते आहे. ‘गणपतीला आपल्या मनात स्थान असले तरच त्याला घरात स्थान मिळेल. सुतक असल्यावर आपण उत्सव साजरा करतो का? घरातील एखादी व्यक्ती निधन पावली तर आपण उत्सव रद्द करतो. करोना हे देशावरील सुतक आहे असे समजा आणि उत्सव रद्द करा. ज्यांना रस्त्यावर गणपती ठेवण्यापासून पर्याय नाही त्यांनी उत्सव रद्द का करू नये?’, या भाषेत या अधिकाऱ्याने मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी बोलताना सल्ला दिला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times