पुणे: माऊंट एव्हरेस्ट शिखर यशस्वीपणे सर करणाऱ्या पुणे पोलीस दलातील कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. स्वप्निल गरड असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. माउंट एव्हरेस्ट शिखर सर केल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यांचे ब्रेन डेड झाले होते. त्यांना उपचाराकरिता काठमांडूतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, शुक्रवारी संध्याकाळी ४ च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
याबाबत अधिक माहिती अशी की, स्वप्नील गरड हे पुणे पोलीस दलात कार्यरत होते. त्यांना गिर्यारोहणाची आवड होती. यापूर्वी त्यांनी जगातील अनेक शिखरे सर केली होती. सुट्टी असल्याने ते जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या माऊंट एव्हरेस्ट या शिखरावर गिर्यारोहणासाठी गेले होते. त्यांनी एव्हरेस्टची मोहीमही फत्ते केली. तिथे शिवाजी महाराजांच्या मूर्तीला नमन करत तिरंगादेखील फडकवला होता. याचे फोटो समोर आले होते. मात्र, शिखर उतरताना त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने काठमांडू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
उपचारादरम्यान ते ब्रेन डेड असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. घटनेची माहिती मिळताच गरड यांना पुण्यात आणण्यासाठी पुणे पोलिसांचे पथक नेपाळला रवाना झाले होते. मात्र, उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पुणे पोलीस दलावर शोककळा पसरली आहे.