विनित जांगळे, ठाणे : विविध विकासकामांच्या भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेला दिव्यातील स्थानिकांची प्रचंड गर्दी उसळली होती. मात्र यावेळी एक दुर्घटना घडली असून ५५ वर्षीय रामजीयावन विश्वकर्मा यांचा घटनास्थळी खुल्या विद्युत तारेचा झटका लागून मृत्यू झाला. सभास्थळी विश्वकर्मा यांना शॉक लागताच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी भाषण थांबवून तेथील विद्युत पुरवठा बंद करण्यास सांगितले. त्यानंतर विश्वकर्मा यांना त्यांच्या मुलाने खाजगी रुग्णालयात दाखल केले. तेथेच त्यांचा बुधवारी रात्री उशिरा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दिवा शहरातील विविध विकासकामांच्या भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रमानंतर दिवा-आगासन रस्ता धर्मवीर नगर येथे बुधवारी सायंकाळी मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा शिवसेनेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली होती. मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर शिंदे प्रथमच दिवानगरीत येत असल्याने जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा नागरी उभे होते तसेच क्रेनला मोठमोठाले हारही लावण्यात आले होते. मुख्यमंत्री सभास्थळी नागरिकांचे अभिवादन स्वीकारत दाखल झाले. काही वेळाने या ठिकाणी स्थानिक कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे भाषणासाठी उभे राहिले. त्यांचे भाषण सुरू असतानाच व्यासपीठाच्या डावीकडील पदपथावर उभ्या असलेल्या नागरिकांमध्ये गोंधळ उडाला. त्यांनी भाषण थांबवून उपस्थित नागरिकांना काय घडले असे विचारले असता त्या ठिकाणी विद्युत तारेचा झटका लागून एक व्यक्ती बेशुद्ध पडल्याचे समोर आले.

Sharad Pawar : संभाजीनगर नाही, औरंगाबादच म्हणणार…शरद पवार खरंच असं म्हणाले की नाही? राष्ट्रवादीने मांडली बाजू

शिंदे यांनी त्याला तात्काळ रुग्णालयात पाठवण्यास सांगून तेथील विद्युत पुरवठा बंद करण्याच्या सूचना दिल्या. रामजीयावन विश्वकर्मा असे या विद्युत तारेचा झटका लागलेल्या व्यक्तीचे नाव होते. त्याला नजीकच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी शिळ डायगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मुख्य रस्ता बंद केल्याने नागरिकांचे हाल : ठाकरे गटाचा आरोप

मुख्यमंत्र्यांच्या सभेचा रंगमंच उभारण्यात आलेला दिवा-आगासन हा मुख्य रस्ता बुधवार सकाळपासूनच नागरिकांच्या वापरासाठी बंद करण्यात आला होता. या रस्त्याचेच लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. हा रस्ता बंद केल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगांवकर यांनी ट्विटरद्वारे केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here