मुंबई: आपल्या दिलखेचक नृत्यशैलीमुळे प्रचंड लोकप्रियता मिळवणारी गौतमी पाटील ही कायमच चर्चेत असते. दर काही दिवसांनी या ना त्या कारणाने गौतमी पाटीलविषयी सतत चर्चा सुरु असते. आतादेखील आणखी एका कारणामुळे सोशल मीडियावर गौतमी पाटीलच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. गौतमीच्या चाहत्यांना तिच्या प्रत्येक गोष्टीविषयी उत्सुकता आहे. त्यामुळेच सध्या इन्स्टाग्रामवर गौतमी पाटीलच्या बालपणीचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोतील गौतमीसोबत असणारी व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून तिची आई आहे. @Official_Gautami941 या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेला फोटो गौतमीच्या आईचा आहे की नाही, याबाबत खात्री नाही. परंतु, गौतमीचे अनेक चाहते हे इन्स्टाग्राम अकाऊंट फॉलो करतात. या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेल्या फोटोला “माझं जग, मी आणि माझी आई”, असे कॅप्शन देण्यात आलेले आहे. या फोटोवर गौतमी पाटीलच्या चाहत्यांकडून प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. गौतमी आपल्या आईची हुबेहूब कॉपी दिसत असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. त्यामुळे सध्या हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

गौतमीसाठी अश्रू अनावर, २० वर्षांपासून विभक्त राहणाऱ्या बापाने लेकीवर टीका करणाऱ्यांना सुनावलं

नुकत्याच एका मुलाखतीत गौतमी पाटीलने आपल्या आईविषयीच्या भावना बोलून दाखवल्या होत्या. गौतमीच्या वडिलांनी ती लहान असताना गौतमीचे वडील त्यांना सोडून गेल्यानंतर आईनेच तिला सांभाळलं. आई- बापाची माया देत तिला लहानाचं मोठं केलं. अशा काळात पैशांची चणचण वाढली आणि परिस्थितीमुळे गौतमीला शाळा सोडावी लागली. आईला थोडी मदत व्हावी म्हणून तिने डान्स करायला सुरुवात केली. या काळात तिची आई आजारी पडली. आता आईची काळजी घेण्यासाठीच ती डान्स करत असल्याचे गौतमीने सांगितले होते. त्यापूर्वी गौतमीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये तिने म्हटले होते की, मी आईसाठीच सारं काही करतेय. एक विचार नेहमी मनात असतो की जर माझं लग्न झालं तर तिचं काय होईल, ती कुठे जाणार, तिला कोण सांभाळणार? हे जरी असलं तरी मी कधीही तिला एकटं सोडून जाणार नाही. एखादवेळेस मी नवऱ्याला सोडेन पण आईला सोडणार नाही, असे गौतमीने म्हटले होते.

गौतमीला ट्रोल करणाऱ्यांना वडिलांचं प्रत्युत्तर

अलीकडेच गौतमी पाटीलचे वडील रवींद्र बाबुराव पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी गौतमीला ट्रोल करणाऱ्यांना खडे बोल सुनावले होते. आपली लेक गौतमी ही संपूर्ण देशात प्रसिद्ध झाली आहे. त्याचा अभिमान पण वाटतो. मात्र काही गोष्टींमुळे तिच्यावर टीका होते तेव्हा दुःख होतं, असं रवींद्र पाटील म्हणाले होते. आपल्या व्यसनामुळे किंवा कौटुंबीक वादामुळे मुलगी गौतमी ही आणि तिची आई हे दोघे सोबत नसल्याचं मोठं दुःखही रवींद्र पाटील यांना आहे. गौतमीची खूप आठवण येते. ती व तिच्या आईने पुन्हा आपल्या सोबत राहावं हे सांगताना रवींद्र पाटील यांना अश्रू अनावर झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here