आरोपी आणि पीडिता एकमेकांच्या ओळखीचे आहेत. ३१ मे रोजी वाठोडा पोलिस ठाण्यात २० वर्षीय तरुणी हरवल्याची तक्रार करण्यात आली होती. या घटनेची गंभीर नोंद घेत पोलिसांनी अपहरण झालेल्या मुलीचा शोध सुरू केला होता. दरम्यान, आरोपी मुलीला वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे घेऊन गेल्याची माहिती पोलीसांना खबऱ्यामार्फत मिळाली. पोलिसांनी तेथे पोहोचून मुलीची सुटका केली. मात्र,आरोपी तेथून फरार होण्यात यशस्वी झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या २० वर्षीय विद्यार्थीनीला आरोपी विशालने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तो तिच्या आई-वडिलांसमोर तिच्या प्रेमाची मागणी करत होता. ३१ मे रोजी विशालने तरुणीला भेटण्यासाठी बोलावले. तरुणी भेटण्यासाठी न आल्याने आरोपी विशालने बळजबरी करत तिचे अपहरण करून वर्धा येथे दुचाकीवर नेले.
वर्ध्यातून आरोपी तरुणीला मुंबईला घेऊन गेला. तेथे पाच दिवस ठेवल्यानंतर तरुणीला वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे नेले. या ठिकाणी आरोपीने एका खोलीत तिच्यावर बलात्कार केला. यानंतर आरोपीने पीडितेचे अनेक दिवस शारीरिक शोषण केले.तसेच बाहेर अत्याचाराची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन तरुणीला बेदम मारहाण केली.
मुलगी बेपत्ता झाल्याने नातेवाईकांनी वाठोडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. मागील दोन दिवसांपासून फरार असलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, आरोपीवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.