बुधवारी दिवा येथे मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा पार पडली. दिवा शहरातील विविध विकास कामांचे लोकार्पण यावेळी मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र, स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी रमाकांत मढवी यांनी मुख्यमंत्र्यांची सभा भर रस्त्यात दिवा आगासन रस्ता बंद करून घेतली. यामुळे नागरिकांना चालण्यास देखील रस्ता उपलब्ध नव्हता. त्याशिवाय सकाळपासून या मार्गावरील रिक्षा बंद केल्याने नागरिकांना पायपीट करत गणेश नगर, बेडेकर नगर व आगासन या भागात चालत जावे लागले. सभेच्या ठिकाणी संध्याकाळी कामावरून येणाऱ्या नागरिकांची गर्दी व्हावी या उद्देशाने रस्ता ब्लॉक करण्यात आला होता आणि यातूनच ही दुर्दैवी घटना घडली का? याची चौकशी आता पोलिसांनी करावी अशी मागणी रोहिदास मुंडे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या स्टेजच्या जवळच हा दुर्दैवी अपघात घडल्याने व त्याठिकाणी तातडीने उपचार उपलब्ध न झाल्याने सदर नागरिकास जीव गमवावा लागल्याचे रोहिदास मुंडे यांनी म्हटले आहे.
ज्यांनी भर रस्त्यामध्ये स्टेज टाकून नागरिकांची येणे जाण्याची वाट बंद केली ते आयोजक रमाकांत मढवी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आता भाजपचे रोहिदास मुंडे यांनी केले आहे. स्वतःची राजकीय ताकद दाखवण्यासाठी जाणीवपूर्वक दिवावासीयांना वेठीस धरण्यात आले असे रोहिदास मुंडे यांनी म्हटले आहे. तसेच विश्वकर्मा यांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांनी तातडीने मदत जाहीर करावी अशी मागणी ही रोहिदास मुंडे यांनी केली आहे.
नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेला दिव्यातील स्थानिकांची प्रचंड गर्दी उसळली होती. यावेळी ५५ वर्षीय रामजीयावन विश्वकर्मा यांचा घटनास्थळी खुल्या विद्युत तारेचा स्पर्श होताच वीजेचा जोरदार झटका लागला. विश्वकर्मा यांना शॉक लागताच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी भाषण थांबवून तेथील विद्युत पुरवठा बंद करण्यास सांगितले. त्यानंतर विश्वकर्मा यांना त्यांच्या मुलाने खाजगी रुग्णालयात दाखल केले. तेथेच त्यांचा बुधवारी रात्री उशिरा मृत्यू झाला.