ठाणे: दोन दिवसांपूर्वी मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरातील एका वसतिगृहात एका २० वर्षांच्या तरुणीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आता मुंबईला लागून असलेल्या मिरारोड येथे दिल्लीच्या श्रद्धा वालकर प्रकरणाची आठवण करुन देणारी घटना घडली आहे. येथे आकाशदीप नावाच्या इमारतीत एका व्यक्तीने आपल्या लिव्ह इन पार्टनरची हत्या केली. या व्यक्तीने नुसती तिची हत्याचं केली नाही तर लिव्ह इन पार्टनरच्या शरीराचे १०० पेक्षा अधिक तुकडे केले, ते कुकरमध्ये शिजवले. काहींच्या म्हणण्यानुसार त्याने हे शिजवलेले तुकडे फ्लश केले असावे तर काहींनी सांगितलं की त्याने ते कुत्र्यांना खाऊ घातले.

या भयंकर हत्याकांडाने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. मनोज साने (५६) असं या आरोपीचं नाव आहे. तर, सरस्वती वैद्य असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. गीता नगर फेज ७ मधील आकाशदीप इमारतीच्या फ्लॅट नंबर ७०४ मध्ये हे दोघे लिव्ह इनमध्ये राहत होते. हे दोघे गेल्या तीन ते चार वर्षांपासून येथे राहत होते. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या फ्लॅटमधून प्रचंड दुर्गंधी येत होती, त्यावरुन या साऱ्या प्रकरणाचा उलगडा झाला.

Crime News: सुटकेसमध्ये २१ वर्षीय तरुणीचा मृतदेह, हत्येची पद्धत पाहून पोलिसही हादरले…
शेजाऱ्यांना सुरुवातीला वाटलं की कदाचित उंदीर मेला असावा म्हणून दुर्गंधी येतेय. पण, जेव्हा त्यांनी पोलिसांनी याची माहिती दिली आणि पोलिस फ्लॅटचं कुलूप तोडून आत शिरले तेव्हा त्यांना जे दृश्य दिसलं, ते पाहून साऱ्यांना मोठा हादरा बसला.

शेजाऱ्यांनी काय-काय पाहिलं?

हॉलमध्ये जाताच भयंकर दुर्गंधी येत होती. हॉलमध्ये रक्त लागलेले वुड कटर ठेवलेलं होतं. त्यानंतर आम्ही जेव्हा बेडरुमध्ये गेलो, तिथे काळ्या रंगाची प्लास्टिक बॅग ठेवलेली होती. त्यामध्ये काहीही नव्हतं. मग आम्ही किचनमध्ये गेलो. तर तिथे डोक्यापासून कापलेली केसांची वेणी फरशीवर पडलेली सापडली. किचनच्या ओट्यावर गॅस शेगडी आणि त्यावर कुकर ठेवलेला होता. त्यामध्ये मानवी मास शिजविलेले होते. तर पातेल्यामध्ये मानवी मास शिजविलेले दिसले. वाश बेसीनमध्ये बकेटमध्ये हाडं अर्धवट जळालेले आढलून आले, तर हिरव्या-काळ्या बकेट आणि टबमध्ये मानवी मांस ठेवलेले दिसून आले.

Pune Crime: मायलेक अन् मुलीचा प्रियकर; घरातच बापाची हत्या, पुणे पोलिसांनी २३० सीसीटीव्ही तपासले, मग…
किचनमध्ये हादरवणारं दृश्य

किचनच्या बकेटमध्ये मानवी शरीराचे अवयव ठेवलेले होते. पण, ते नेमके कोणते अवयव होते हे काही कळत नव्हतं. एका बकेटमध्ये मांडीचा भाग असल्यासारखं दिसत होतं.

शेजाऱ्याने दार ठोठावलं तर त्याने रुमफ्रेशनर मारलं

फ्लॅट नंबर ७०४ मधून तीव्र दुर्गंधी येत होती. त्यामुळे शेजारच्या एका तरुणाला त्याच्या आईने सांगितलं की जरा जाऊन विचार त्यांना काय झालंय, उंदिर वगैरे मेलाय का. तेव्हा त्यांचा मुलगा गेला आणि त्याने दार ठोठावलं. पण, कुणीही प्रतिसाद दिला नाही. तेवढ्यातच आतून रुमफ्रेशनर मारत असल्याचा आवाज येऊ लागला. मुलाने दाराला कान लावून पाहिलं तर रुमफ्रेशनर मारत असल्याचा आवाज येऊ लागला. मग, मुलगा आईला येऊन म्हणाला की ते दार उघडत नाहीये. त्यानंतर सायंकाळी साडे पाच वाजताच्या सुमारास मनोज साने हा तयार होऊन घरातून निघाला. त्याने हेल्मेट घातलेलं, मास्क लावलेला, त्याच्याकडे एक बॅग देखील होती.

फेसबुकवरील प्रेम ‘लिव्ह इन’पर्यंत आलं, संशयाचं भूत डोक्यात शिरलं, एकाच वादात सगळं संपवलं!

कशी उघडकीस आली घटना?

तो घरातून बाहेर पडला तेव्हा देखील घरातून खूप तीव्र दुर्गंधी येत होती. त्यानंतर त्याने टाळं लावलं आणि निघून गेला. मनोज सानेसोबत त्याची लिव्ह इन पार्टनरही त्याच फ्लॅटमध्ये राहत होती. पण, मनोजने घराला टाळं मारल्याने शेजाऱ्यांचा संशय बळावला. त्यानंतर थेट पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी जेव्हा त्याचं दार उघडलं तेव्हा घरातील दृश्य पाहून सारेच हादरुन गेले होते.

याप्रकरणी पोलिसांनी मनोज सानेला अटक केली असून त्याच्यावर ३०२ आणि २०१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला न्यायालयाने १६ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत. तर, त्याने सरस्वती वैद्य यांचा खून का केला याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here