संध्या महेंद्र कोरे (वय ४८) असं मृत महिलेचं नाव असून, त्या चंद्रशेखर वार्डातील रहिवासी आहे. करण महेंद्र कोरे (२४) असं गंभीर जखमी मुलाचं नाव आहे. गोंदिया शहर पोलिसांनी घटनास्थळ गाठून अज्ञात मारेकऱ्यांचा शोध सुरू केला. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांनी सुरू केला आहे. या संदर्भात माहिती अशी की, संध्या कोरे आणि त्यांचा मुलगा करण हे दोघेही घरात झोपले असताना अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर ते दोघे किचनमध्ये रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले.
या घटनेत संध्या कोरे यांचा मृत्यू झाला तर मुलगा करण जखमी झाला. घटनेची माहिती शेजाऱ्यांनी शहर पोलिसांना देताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. तपासात असे कळून आले की रात्रीच्या सुमारास संध्या आणि करण झोपले असताना काही अज्ञात आरोपींनी घरात प्रवेश केला आणि दोघांवर जीवघेणा वार केला.
यादरम्यान झालेल्या झटापटीत किचन रूममध्ये रक्ताचे डाग आढळून आले. यात संध्या यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांच्या शरीरावर पाच ते सह जखमा आढळून आल्या आहेत. या घटनेत मुलगा करण हा गंभीर जखमी झाल्याने त्याला तात्काळ गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी पाठवलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेतील आरोपी अज्ञात असल्याने वरील घटना कोणत्या आरोपींनी आणि कोणत्या कारणासाठी घडवली? हा प्रश्न पोलिसांसमोर उभा आहे. मुलगा करण शुद्धीवर आल्यानंतरच घटनेची माहिती मिळू शकण्याची शक्यता वर्तविली जात आहे.