मालगाडीवर कोरोमंडल एक्स्प्रेस धडकली
कोरोमंडल एक्स्प्रेस ही २ जून रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास उभ्या मालगाडीला धडकली. कोरोमंडल एक्स्प्रेस ही तब्बल १२८ किमी प्रति तासाच्या वेगाने मालगाडीवर धडकल्याने भीषण अपघात घडला. त्याचे काही डबे मालगाडीवर चढले तर काही रुळावरुन घसरले. त्यानंतर त्याचदरम्यान या रेल्वे रुळावरुन जाणारी बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस आली आणि ती देखील कोरोमंडल एक्स्प्रेसवर आदळली. या अपघातामागे नेमकं कारण काय याचा शोध घेतला जात आहे. याचदरम्यान, अपघातापूर्वी ट्रेनमधील एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ कोरोमंडल एक्स्प्रेसच्या अपघाताच्या काही सेकंदांपूर्वीचा असल्याचा दावा केला जात आहे.
अपघातापूर्वीचा व्हिडिओ होतोय व्हायरल
ओडिशा रेल्वे अपघातानंतर अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते. मात्र, सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा अपघाताच्या पूर्वीचा असल्याचा दावा केला जात आहे.
सफाई कामगार रात्री फरशी साफ करताना दिसतोय आणि नंतर काहीच सेकंदात
रात्रीच्या वेळी एक सफाई कर्मचारी ट्रेनच्या डब्यात साफसफाई करत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. तर, एक प्रवासी या कर्मचाऱ्याचा डब्यातील व्हिडिओ काढत आहे. तर इतर प्रवासी त्यांच्या बर्थवर आराम करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. मग, काहीच सेकंदात अचानक जोरदार हादरा बसतो आणि ट्रेनमध्ये सारंकाही उलटंपालटं झाल्याचं कळतं. कॅमेरा जोरजोरात हलताना दिसतो. लोकांच्या किंचाळण्याचा आवाज येतो. २७ सेकंदाचा हा व्हिडिओ थरकाप उडवणारा आहे.