गया जिल्ह्याच्या लकडाही गावात अशोक कुमार नावाच्या तरुणाची हत्या झाली होती. त्यानंतर ५ दिवसांनी त्याचा भावजी ज्याने त्याची हत्या केल्याचा आरोप आहे, त्याचाही मृतदेह सापडून आल्याने खळबळ माजली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत या घटनेचा छडा लावला.
लग्नाच्या दोन दिवसांनी नवरदेवाची हत्या
मृत अशोक कुमार याचं २९ मे रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील एका गावात लग्न झालं होतं. ३१ मे रोजी अशोकच्या घरी लग्नानंतरचे काही विधी पार पडले. यानंतर अशोकच्या मोबाईलवर एक कॉल आला. मित्र भेटायला आलाय, त्याला भेटून येतो असं अशोकने कुटुंबीयांना सांगितले आणि तो घरातून निघून गेला. रात्री उशिरापर्यंत अशोक घरी परतलाच नाही. यानंतर अशोकचा भाऊ धर्मेंद्र कुमार याने गुरुआ पोलिस ठाण्यात भाऊ बेपत्ता असल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी अशोक कुमारचा शोध सुरू केला.
पत्नीच्या अनैतिक संबंधांची माहिती
लग्नाच्या दोन दिवसांनंतर म्हणजेच १ जून रोजी पोलिसांना अशोक कुमारचा मृतदेह गुरुआ पोलिस स्टेशन हद्दीतील बैजू कोना अहर या बेलगाम्मा गावाजवळ आढळून आला. हे प्रकरण गांभीर्याने घेत गयाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक आशिष भारती यांनी शहर एसपी हिमांशू, शेरघाटी एसडीपीओ यांच्याकडे तपास सोपवला. नववधूचे चुलत भावजी उपेंद्र यादवसोबत अनैतिक संबंध असल्याची बाब तपासात समोर आली. लग्नानंतर अशोकला पत्नीच्या या संबंधांबाबत कळालं होतं. त्यामुळे तिने अशोक संपवण्याचं ठरवलं आणि त्याच्या हत्येचा कट रचला.
मोबाईल लोकेशनवरुन पोलिसांचा संशय बळावला
पोलिसांनी सांगितलं की, ज्या दिवशी अशोक कुमारची हत्या झाली होती, त्या दिवशीच्या त्याच्या मोबाईलचं लोकेशन आणि उपेंद्र यादव याच्या फोनचं लोकेशन एकच होतं. उपेंद्र यादव हा अशोक कुमारच्या पत्नीच्या संपर्कात होता. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी नववधूची कठोर चौकशी केली. तेव्हा काहीच वेळात तिने आपला गुन्हा कबुल केला. उपेंद्र यादवने अशोक कुमारची धारदार शस्त्राने हत्या केल्याचं तिने चौकशीत सांगितलं. सध्या पोलिसांनी नवविवाहितेला अटक केली असून पुढील कारवाई करत आहेत.
५ दिवसांनी प्रियकर भावजीचा मृतदेह सापडला
अशोक कुमारच्या हत्येमध्ये नववधूसोबत सहभागी असलेला तिच्या भावजीचाही मृत्यू झाला आहे. एका रस्त्याच्या कडेला ३५ वर्षीय उपेंद्र यादवचा मृतदेह मंगळवारी आढळून आला होता. याप्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्यात यूडी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, त्याचा मृत्यू कसा झाला, याचं गूढ अद्याप उलगडलेलं नाही.
प्रियकर भावजीच्या मृत्यूचं गूढ कायम
गयाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक आशिष भारती यांनी सांगितले की, ३१ मेच्या रात्री अशोक कुमार यांची गुरुआ पोलीस स्टेशन परिसरात हत्या करण्यात आली. ते गांभीर्याने घेत गया पोलिसांनी शहर एसपीच्या नेतृत्वाखाली, शेरघाटी एसडीपीओच्या सहकार्याने, तांत्रिक तपास तीव्र केला. तपासादरम्यान, ६ जून रोजी आमस पोलिस स्टेशन हद्दीतील लंबुआ मोड उत्तरगंज जीटी रोडच्या बाजूला उपेंद्र यादवचा मृतदेह सापडला होता. उपेंद्र यादव यांच्या फोनवर मृत अशोक कुमारच्या मोबाईलचे डिटेल्स सापडले आहे. उपेंद्र यादव हा अशोक कुमार यांच्या पत्नीसोबत फोनवरून संपर्कात होता. पोलिसांनी मोबाईल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला आहे. जेणेकरून आरोपींना कायद्यानुसार कठोर शिक्षा होऊ शकेल.