मिरा रोडच्या गीता नगरमध्ये ज्या घरात सरस्वती व मनोज राहत होते, तिथे पोलिसांना घरात झाडे कापण्याचे यंत्रही सापडले. मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी हे यंत्र वापरण्यात आले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. घरातील कुकरमध्येही मृतदेहाचे काही तुकडे शिजवलेल्या स्थितीत पोलिसांना सापडले. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांचे मत आहे.
सरस्वतीने विष प्राशन करून आत्महत्या केली असून त्यासाठी आपल्याला जबाबदार धरू नये, यासाठी मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचे मनोजचे म्हणणे आहे. मात्र, मनोजनेच तिची हत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. मनोज मागील काही दिवसांपासून उशिरा घरी येत असल्याने सरस्वती संशय घेत होती, त्यामुळे दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याचे मनोजने तपासात सांगितले. ते दोघेही अनाथ असल्याने मागील दहा वर्षांपासून एकत्र राहत होते. आरोपी मनोजला गुरुवारी ठाणे न्यायालयासमोर सादर करण्यात आले. तेव्हा त्याला १६ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त जयंत बजबळे यांनी दिली.
राज्य महिला आयोग सदस्यांनी घेतली पोलिसांची भेट
महिला आयोगाच्या सदस्य ॲड. गौरी छाब्रिया आणि उत्कर्षा रुपवते यांनी गुरुवारी दुपारी नया नगर पोलिस ठाण्याला भेट देऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांशी या प्रकरणाबाबत चर्चा केली. संबंधित आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, तसेच या घटनेमागची कारणे काय आहेत, याचादेखील पोलिसांनी सखोल तपास करावा, अशी मागणी दोन्ही सदस्यांनी केली.