मुंबई: क्रौर्याची परिसीमा गाठून संपूर्ण शहराला हादरवून सोडणाऱ्या मिरारोड हत्याप्रकरणातील आरोपी मनोज साने याच्या एका दाव्यामुळे या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. कालपर्यंत मनोज साने याने त्याची लिव्ह इन पार्टनर सरस्वती वैद्य (वय ३४) हिची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे २० तुकडे केल्याचे सांगितले जात होते. मात्र, मनोजने पोलीस चौकशीत नोंदवलेल्या जबाबात वेगळीच थिअरी मांडली आहे. मी सरस्वतीची हत्या केली नाही तर तिने विषप्राशन करुन आत्महत्या केली. त्यानंतर हत्येचा आळ माझ्यावर येईल या भीतीने मी घाबरून सरस्वतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याचे तुकडे केले, असा दावा मनोज साने याने केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पोलिसांसमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, मनोज साने याने आपल्याला श्रद्धा वालकर प्रकरणावरुन सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे करण्याची कल्पना सुचल्याचे सांगितले. वसईच्या श्रद्धा वालकर हिची तिचा लिव्ह इन पार्टनर आफताब पुनावाला याने अशाचप्रकारे हत्या केली होती. आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करुन त्यांची विल्हेवाट लावली होती. आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करुन ते फ्रीजमध्ये ठेवले होते. तसेच मृतदेहाची दुर्गंधी लपवण्यासाठी रुम फ्रेशनर्स, अत्तरांचा वापर केला होता. मनोज साने यानेदेखील सरस्वती वैद्य हिची हत्या केल्यानंतर निलगिरी तेलाच्या पाच बाटल्या खरेदी केल्या होत्या. मृतदेह लवकर कुजू नये,यासाठी मनोजने त्यावर निलगिरी तेल लावले होते. आफताब पुनावालाही श्रद्धाचे मुंडके आणि मृतदेहाचे इतर तुकडे अनेक दिवस घरात ठेऊन सहजपणे वावरत होता. त्याप्रमाणे मनोज साने यानेही किचन आणि बेडरुममध्ये सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे ठेवले होते आणि दुसऱ्या बेडरुममध्ये तो रोज झोपत होता. मात्र, आम्हाला या हत्येमागील नेमका उद्देश शोधून काढायला असल्याचे पोलिसांनी सांगितले. मनोजला गुरुवारी ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी मनोजला १६ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

दोन-तीन दिवसांपासून मनोज कुत्र्यांना खायला घालत होता, ते वाक्य ऐकताच पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली

मनोजला ५००० पगार, फ्लॅटचं भाडं १० हजार, नोकरी गेली अन्…

मनोज साने आणि सरस्वती वैद्य राहत असलेला मिरारोड येथील फ्लॅट हा सोनम बिल्डर्सच्या मालकीचा आहे. त्यांनी पहिल्यांदाच हा फ्लॅट भाड्याने दिला होता. भाड्याचा करारनाम्यात मनोज वैद्य याचे नाव होते. त्यामध्ये कुठेही सरस्वती वैद्यचा उल्लेख नव्हता. गीता आकाशदीप हाऊसिंग सोसायटीतील रहिवाशांना मनोज साने आणि सरस्वती वैद्य हे पती-पत्नी आहेत, असे वाटत होते. मनोज आणि सरस्वती हे दोघे गेल्या तीन वर्षांपासून या फ्लॅटमध्ये राहत होते. या दोघांमध्ये सातत्याने खटके उडत होते. त्यामुळे मनोजने सरस्वतीची हत्या रागाच्या भरात केली की हे सर्वकाही नियोजनपूर्वक केले होते, याचा शोध पोलीस घेत आहेत.

मिरारोड मर्डर केस; फरशीवर केसांची वेणी, बेसिनमध्ये रक्ताने भरलेल्या बादल्या, प्रत्यक्षदर्शीने सारं सांगितलं

मनोज काम करत असलेल्या बोरिवली येथील रेशन दुकानाचा परवाना २९ मे रोजी रद्द झाला होता. तेव्हापासून मनोज साने घरीच होता. रेशनच्या दुकानात त्याला महिन्याला ५००० रुपये पगार मिळायचा. मिरारोड येथील फ्लॅटचे भाडे १० हजार इतके होते. मनोजची नोकरी गेल्यामुळे घरातील खर्चासाठी पैसे उरत नव्हते. सरस्वती याविषयी विचारणा करायची, यावरुन दोघांमध्ये भांडणं व्हायची. मात्र, मनोज साने याला बोरिवली येथील साने रेसिडन्सी या इमारतीमधील भाड्यावर दिलेल्या फ्लॅटचे ३५ हजार इतके भाडे मिळायचे. गेल्या तीन वर्षांपासून या फ्लॅटमध्ये भाडेकरु आहे. मनोजने भाडेकरुकडून प्रत्येक महिन्याच्या तारखांचे चेक आधीच घेऊन ठेवायचा. प्रत्येक महिन्याला मनोज एक-एक चेक बँकेत डिपॉझिट करत असे. मनोजकडून आपल्याला कधीही कोणताही त्रास झाला नसल्याचे भाडेकरून सांगितले.

बोरिवलीतील ही जागा साने कुटुंबीयांची होती. या जागेवर २००८ मध्ये इमारत बांधण्यात आली. या इमारतीमध्ये साने कुटुंबीयांना चार फ्लॅटस मिळाले होते. मनोज अनेक वर्षे या इमारतीकडे फिरकला नव्हता. त्यामुळे त्याच्याविषयी आणि सरस्वती वैद्य यांच्याविषयी कोणालाही फारशी माहिती नव्हती. साने कुटुंबातील इतर नातेवाईकांनीही आमचा मनोजशी कोणताही संबंध नव्हता, असे सांगितले.

पोलिसांच्या हाती पिशव्या, कुत्र्यांचा भेसूर आवाज.. मीरारोडमध्ये थरकाप उडवणारी घटना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here