म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबईसह संपूर्ण राज्याला हादरवून टाकणाऱ्या मरिन ड्राइव्ह येथील वसतिगृह हत्याप्रकरणी गंभीर बाब समोर आली असून वसतिगृहातील सीसीटीव्ही गेल्या वर्षभरापासून बंद असल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. त्याबरोबरच या वसतिगृहात महिला सुरक्षा रक्षक नसल्याची बाबही राज्य महिला आयोगाच्या सदस्यांच्या भेटी दरम्यान उघड झाली आहे. त्यामुळे याप्रकरणी महिला आयोग नेमकी काय भूमिका घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

मरिन ड्राइव्ह येथील वसतिगृहात तरुणीच्या हत्येचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती. याप्रकरणी महिला आयोगाने उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालक आणि मरिन ड्राइव्ह पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तर आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रुपवते, सुप्रदा फातर्पेकर यांनी या वसतिगृहाला भेट दिली होती. या भेटीत वरील गंभीर बाबी समोर आल्या आहेत.

या भेटीबद्दल अधिक माहिती देताना उत्कर्षा रुपवते म्हणाल्या की, या संपूर्ण भेटीत अनेक त्रुटी आणि प्रशासकीय उणीवा लक्षात आल्या आहेत. वसतिगृहातील सीसीटीव्ही गेले वर्षभर काम करत नाहीत. मनुष्यबळाची कमतरता आहे, महिला सुरक्षा रक्षक नाही, मुलींना तक्रार करण्यास पेटी किंवा कुठलाही संपर्क क्रमांक देण्यात आलेला नाही, वसतिगृहाच्या अधीक्षकांकडे अतिरिक्त कार्यभार आहे. यासोबतच पीडितेने याआधीही आपल्याला होणाऱ्या त्रासाबद्दल सांगितले होते पण कुठलीच कारवाई केली गेली नाही, असा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे या सर्व बाबींची सखोल चौकशी केली गेली पाहिजे, अशी आमची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर यासंदर्भात पोलिस आणि शिक्षण विभागाचा अहवाल आल्यानंतर पुढील योग्य त्या सूचना देण्यात येणार असल्याचे उत्कर्षा रुपवते यांनी सांगितले.

Mumbai Crime : मुंबईत तरुणीची हत्या; एकुलती एक मुलगी होती, पीडितेच्या वडिलांना अश्रू अनावर, महिला कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप

‘प्रकरण सीबीआयकडे द्या’

सावित्रीबाई फुले वसतिगृहातील हत्या करण्यात आलेल्या तरुणीच्या पालकाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी गुरुवारी केली. मुंबई पोलिस आरोपीबाबत सविस्तर माहिती देत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, दुपारी त्यांनी तरुणीचा मृतदेह ताब्यात घेतला आणि सायंकाळी चैत्यभूमी येथे तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Crime Diary: खोलीत तरुणीची तर प्लॅटफॉर्मवर गार्डची बॉडी; मैत्रिणीने उलगडलं सिक्रेट, मुंबईतल्या हॉस्टेलची हॉरर स्टोरी
वांद्रे येथील शासकीय पॉलिटेक्निकल महाविद्यालयात शिकणारी तरुणी मरिन ड्राइव्ह येथील सावित्रीबाई फुले वसतिगृहातील राहत होती. याच वसतिगृहातील सुरक्षारक्षक ओमप्रकाश कनोजिया याने या तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या केली. या घटनेमुळे सगळीकडे संताप व्यक्त होत असून अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी वेगवेगळ्या माध्यमांतून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तरुणीचे वडील गजानन मेश्राम हे देखील घटना समोर आल्यापासून मुंबईत असून गुरुवारी त्यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेतली. मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीने रेल्वेखाली आत्महत्या केल्याचे पोलिस सांगत आहेत. मात्र त्याच्याबाबत काहीच माहिती आम्हाला दिली जात नाही. गाडीखाली दररोज शेकडो बळी जातात. तो मृतदेह आरोपीचा आहे हे कशावरून? केवळ हातामध्ये कडे आहे म्हणून तोच आरोपी आहे असे होते का? असा सवाल करतानाच या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा, अशी मागणी मेश्राम यांनी केली आहे.

या प्रकरणात अनेक आरोपी असण्याची शक्यता आहे. अन्य आरोपींनी या आरोपीला रेल्वेखाली नेऊन मारले असावे. त्यामुळे या प्रकरणाची खोलवर चौकशी व्हायलाच हवी आणि यातील सर्व बाबी आमच्या निदर्शनास आल्या पाहिजेत, अशीही मागणी मेश्राम यांनी यावेळी केली. अनेक राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी पोलिस ठाण्यात जाऊन यामध्ये निष्पक्षपाती तपास व्हावा, अशी मागणी केली. तरुणीच्या पालकांनी जे. जे. रुग्णालयातून तिचा मृतदेह ताब्यात घेतली. दादर येथील चैत्यभूमीवर तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here