वृत्तसंस्था, बालासोर : ओडिशातील बालासोर येथे नुकत्याच झालेल्या भीषण रेल्वे अपघातातील बळींचे मृतदेह अपघातस्थळापासून जवळ असलेल्या बहानगा हायस्कूलमध्ये ठेवण्यात आले होते. टीव्हीवरील वृत्तांमध्ये शाळेच्या इमारतीत ठेवलेले मृतदेह पाहिल्यानंतर विद्यार्थी शाळेत येण्यास घाबरत आहेत.

दोन जून रोजी घडलेल्या या रेल्वे अपघातात २८८ प्रवासी मृत्युमुखी पडले. मृतदेह ठेवण्यासाठी बहानगा हायस्कूलच्या ६५ वर्षे जुन्या असलेल्या इमारतीचा वापर करण्यात आला होता. एकाच वेळी एवढे बळी घेणाऱ्या या भीषण अपघाताशी ही इमारत जोडली गेल्याने त्यामध्ये पुन्हा शाळा शिकण्याची विद्यार्थ्यांची आणि पालकांचीही मनस्थिती नाही. ही इमारत जुनीही असल्याने ती पाडून टाकण्याची विनंती शाळेच्या व्यवस्थापन समितीने राज्य सरकारकडे केली आहे.

बहानगा हायस्कूलच्या मुख्याध्यापिका प्रमिला स्वेन म्हणाल्या, की लहान मुले घाबरलेली आहेत. त्यांना भीतीतून बाहेर काढण्यासाठी काही आध्यात्मिक कार्यक्रम घेण्याचे नियोजन शाळा करीत आहे. शाळेतील काही मोठे विद्यार्थी आणि ‘एनसीसी’चे छात्र यांनी तर बचावकार्यातही भाग घेतला होता.’
LIVE VIDEO: जोरदार धडक बसली आणि… ओडिशा रेल्वे अपघाताच्या वेळी एसी कोचमध्ये काय सुरू होते पाहा
बालासोरचे जिल्हाधिकारी दत्तात्रय शिंदे यांनी गुरुवारी शाळेला भेट दिली. ते म्हणाले, ‘मी शाळेची व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, कर्मचारी वर्ग; तसेच स्थानिकांची भेट घेतली. शाळेची इमारत पाडून टाकावी असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांना तसे निवेदन देण्यास सांगितले आहे.’

बहानगा हे पूरप्रवण क्षेत्र आहे. शाळेची इमारत अनेकदा पुराच्या वेळी लोकांना आश्रय देण्यासाठी वापरली जाते. सध्या सुरू असलेल्या परिवर्तन कार्यक्रमांतर्गत शाळेचे नूतनीकरण केले जाऊ शकते, असेही ते म्हणाले. शाळेच्या इमारतीतील मृतदेह नंतर भुवनेश्वर येथे हलविण्यात आले होते; तसेच शाळेचे आवार स्वच्छ आणि निर्जंतुक करण्यात आले होते. तरीही विद्याथी आणि पालक भीतीच्या सावटाखाली आहेत.
VIDEO: जोरदार धमाका आणि लोकांच्या किंकाळ्या, अपघाताच्या काही सेकंदांपूर्वी कोरोमंडल एक्स्प्रेसमध्ये काय घडलं?
टीव्हीवरील वृत्तामुळे जखमी मुलाची पालकांसोबत भेट

कटक : वृत्तवाहिनीवरील एका वृत्ताने बालासोर येथील भीषण रेल्वे अपघात जखमी झालेल्या १५ वर्षीय नेपाळी मुलाची आपल्या आई-वडिलांशी भेट होऊ शकली. रामानंद पासवान असे या मुलाचे आहे. कोरोमंडल एक्स्प्रेसमधून तो आपल्या तीन नातेवाइकांसोबत प्रवास करीत होता. त्या तिघांचाही अपघातात मृत्यू झाला, सुदैवाने रामानंद बचावला. त्याच्यावर कटकमधील रुग्णालयात ‘आयसीयू’मध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, त्याचे आई-वडील अपघाताचे वृत्त समजताच थेट भुवनेश्वरमध्ये आले. मुलाचा शोध घेण्यासाठी ते एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात फिरत होते.

दरम्यान, एम्स रुग्णालयात एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराशी त्यांची भेट झाली. त्यांनी आपली व्यथा कॅमेऱ्यासमोर कथन केली. रुग्णालयात दाखल असलेल्या रामानंदने टीव्हीवर ही बातमी पाहून रुग्णालय प्रशासनाला याबाबत सांगितले. रुग्णालयाने संबंधित टीव्ही चॅनेलच्या ऑफिसमध्ये जाऊन तो व्हिडीओ पुन्हा तपासला आणि मुलाच्या आई-वडिलांचा शोध घेऊन त्यांची मुलाशी भेट घडवून आणली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here