अहमदनगर : भारतीय जनता पक्षाने लोकसभा आणि त्या पाठोपाठ विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख म्हणून त्यांच्या पक्षांची नियुक्ती केली आहे. या यादीत अनेक ठिकाणी त्या मतदारसंघातील प्रबळ दावेदारांचाच समावेश असल्याचे दिसून येते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या गटाला गाफील ठेवून केलेली ही भाजपची खेळी असल्याचे मानले जात आहे. जागा वाटपाच्यावेळी ही खेळी शिंदे गटाला अडचणीची ठरू शकते. मुळात इतर सर्व पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली असली तरी शिंदे गटाने आपली स्वतंत्र तयारी अद्याप सुरू केल्याचे दिसून येत नाही. उलट शासन आपल्या दारी सारख्या कार्यक्रमांतून मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांचे मंत्रीही केंद्र आणि राज्य सरकार पर्यायाने भाजपचाच प्रचार करताना दिसत आहेत.

भाजपने काल प्रथम लोकसभा मतदारनिहाय प्रमुख म्हणून त्यांच्या पक्षाच्या नेत्यांच्या नियुक्त्या केल्या. अनेक मतदारसंघात तर इच्छुक आणि प्रबळ दावेदार असलेल्या नेत्यांकडेच जबाबदारी सोपविण्यात आली. त्यामुळे सुरवातीला अशी चर्चा सुरू झाली की, या इच्छुकांचे उमेदवारीचे पत्ते कट करण्यासाठीच पक्षाने ही खेळी खेळली आहे. मात्र, अनेक ठिकाणी असे प्रमुख नियुक्त केले आहेत, की तेच प्रबळ दावेदार ठरतात. नगर जिल्ह्याचेच उदाहरण घेतले तर कर्जत-जामखेडला प्रा. राम शिंदे, राहुरीला शिवाजी कर्डिले, अकोलेत वैभव पिचड, कोपरगाव स्नेहलता कोल्हे, नेवासा बाळासाहेब मुरकुटे, नगर शहर भय्या गंधे, पारनेर विश्वनाथ कोरडे अशा उच्छुक आणि दावेदार नेत्यांचीच प्रमुख म्हणून वर्णी लागली आहे. अर्थात मतदारसंघ प्रमुख केले म्हणजे त्यांना उमेदवारी दिली जाणार की नाही, हे मात्र स्पष्ट झालेले नाही. तर काही ठिकाणी अगदीच नवख्या नेत्यांना प्रमुख म्हणून जबाबदारी दिल्याचे दिसून येते. तेथे मात्र, बड्या नेत्यांना सेफ ठेवल्याचे दिसून येते. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिर्डी मतदारसंघात रघुनाथ बोठे प्रमुख आहेत. शेवगावमध्ये नारायण पालवे तर श्रीगोंद्यात बाळासाहेब महाडीक यांना प्रमुख म्हणून नियुक्त केले आहे. विद्यामान आमदारांकडे ही जबाबदारी दिलेली नाही.

दोन्ही निवडणुका स्वबळावर लढण्याची भाजपची तयारी, शिवसेनेसोबतच्या युतीबाबत सावधगिरी
लोकसभेच्या राज्यातील सर्व ४८ आणि विधानसभेच्या सर्व २८८ मतदारसंघात भाजपने मतदारसंघ प्रमुख नियुक्त केले आहेत. निवडणुका केव्हा होणार? दोन्ही एकत्र होणार का? जागा वाटपांचे काय? या प्रश्नांची नेमकी उत्तरे मिळाली नसतानाच भाजपने आघाडी घेत मतदारसंघ प्रमुख जाहीर केले आहेत. महाराष्ट्रातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांच्या निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या केल्या. सर्व विधानसभा निवडणूक प्रमुख त्यांच्या अनुभव व संघटन कौशल्याच्या बळावर संघटन बळकट करून २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना युतीला विजय मिळवून देतील, असे या नियुक्त्या जाहीर करताना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. याचा अर्थ युती गृहित धरून नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्त नेत्यावर दोन्ही पक्षांची जबाबदारी राहील, असे सूचित होते. मात्र, शिंदे गटाकडून अद्याप काहीच हालचाल नाही. त्यांच्याकडूनही असे प्रमुख नियुक्त केले जाणार का? की हेच प्रमुख काम पाहणार, असा प्रश्नच तर आहेच. शिवाय या प्रमुखांच्या माध्यमातून आतापासूनच भाजपने तयारी सुरू केल्याने प्रत्यक्ष प्रक्रिया आणि जागा वाटपाची वेळ येऊ पर्यंत त्यांची मजबूत पकड झालेली असेल. पक्षातून इच्छुक उमेदवारही पुढे आलेले असतील, अशा वेळी जागा वाटपात शिंदे गटाची अडचण होऊ शकते, अशीही चर्चा आता सुरू झाली आहे.

मी लवकरच क्रांतिकारी निर्णय घेईन, राहुल नार्वेकरांच्या सूचक विधानाची सर्वत्र चर्चा

दुसरीकडे, भाजपने या नेत्यांना मतदारसंघ म्हणून पुढे आणत प्रस्थिपितांना इशारा दिला आहे. अनेक इच्छुकांचे पत्ते कापले जाणार, उमेदवार ठरविण्यासाठी भाजपला पुरेसा वेळ मिळणार, अशीही ही खेळी असल्याचे मानले जात आहे. सतत निवडणूक मोडवर असलेल्या भाजपकडून अशीच अपेक्षा असल्याचेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here