तिबेट आणि अरुणाचल प्रदेशच्या सीमेवरील ‘शांग्री ला व्हॅली’ (Shangri La Valley) हे असेच एक ठिकाण आहे. त्याचे गूढ आजपर्यंत कोणालाही कळू शकलेले नाही. असं म्हटले जातं की ते खूप धोकादायक आहे आणि जर कोणीही येथे गेले तर ती व्यक्ती कधीही येथून परत येत नाही.
अनेक जण हे ठिकाण दुसऱ्या जगातील असल्याचं सांगतात. तिबेटी साधकही याबद्दल सांगतात. लोककथेत याला अतिशय पवित्र ठिकाण मानलं जातं, परंतु कोणीही येथे जाऊन त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न करत नाही. असं मानले जाते की या ठिकाणी गेल्याने व्यक्ती किंवा वस्तूचे अस्तित्व जगातून नाहीसं होऊन जातं.
प्रसिद्ध तंत्र साहित्य लेखक अरुण कुमार शर्मा यांनीही त्यांच्या ‘तिब्बत की वह रहस्यमयी घाटी’ या पुस्तकात या ठिकाणाचा तपशीलवार उल्लेख केला आहे. त्यांनी या पुस्तकात असं लिहिलं आहे की, ही अशी जागा आहे की, जिथे चुकूनही जर कोणी गेलं तर त्याला येथून परत येणे अशक्य होतं.
काही जण असंही सांगतात की या ठिकाणी वेळ थांबून जातो. या ठिकाणावरुन कुठला विमानही जाऊ शकत नाही. तिबेटी विद्वान युत्सुंग यांच्या मते, या जागेचा संबंध अवकाशातील दुसऱ्या कुठल्या जगाशी आहे. युत्सुंग स्वतः तिथे गेल्याचा दावाही करतात. त्यांच्या म्हणण्यानुसार, तेथे सूर्यप्रकाश किंवा चंद्रप्रकाश नव्हता. दुधाळ प्रकाश सगळीकडे पसरलेला दिसत होता. तसेच एक विशेष प्रकारची शांतताही तिथे होती, असं त्यांनी सांगितलं. शांग्रीला घाटाला जगातील दुसरा बर्म्युडा ट्रँगल म्हटलं जातं.